चविष्ठ शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे वाण विकसित

- Advertisement -

शेत शिवार । नाशिक : गव्हाचा उपयोग केवळ पोळ्या करण्यासाठी केला जात नाही तर गव्हापासून तयार केलेले अनेक पदार्थ चवीने खाल्ले जातात. शेवाया व कुरडया हे त्यापैकीच एक चविष्ठ पदार्थ. आतापर्यंत बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या दर्जाच्या गव्हाच्या पीठापासूनच हे पदार्थ तयार केले जात मात्र आता निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने शेवया व कुरड्यासाठी प्रक्रियायोग्य असा ‘बन्सी’ प्रकारातील ‘एनआयडीडब्ल्यू-११४९’ हा नवा गहू वाण विकसित केला आहे. पुढील वर्षापासून त्याचे बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध होणार आहे.

रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक आहे. याचे उत्पादन पंजाब व हरयाणा या राज्यात अधिक घेतले जाते. महाराष्ट्रातही याचे उत्पादन घेतले जात असले तरी शेतकर्‍यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे कमी पानी, बदलते हवामान व तांबेरासारख्या कीड रोगांना दूर ठेवणार्‍या नव्या वाणावर देशभरात संशोधन सुरु आहे. याच अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्राने अधिक उत्पादकता व तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केले आहेत. यामध्ये राज्यातील मागणी अभ्यासून पास्ता, शेवया व कुरड्यासाठी प्रक्रियायोग्य असा ‘बन्सी’ प्रकारातील ‘एनआयडीडब्ल्यू-११४९’ हा नवा गहू वाण विकसित केला आहे.

अखिल भारतीय समन्वित गहू सुधार प्रकल्पाच्या अनेक चाचण्या येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर सुरू असतात.त्याच अनुषंगाने २४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या यासंबंधी वार्षिक बैठकीत ‘एनआयडीडब्ल्यू ११४९’ या ’बन्सी’ प्रकारातील वाणाची भारतातील द्वीपकल्पीय विभागासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासाठी नियंत्रित पाण्याखाली लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. हा वाण शेवया, कुरडया आदींसाठी उपयुक्त असल्याचे परिणाम तपासून याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

या शास्त्रज्ञांची कमाल

पुढील वर्षीपासून कृषी संशोधन केंद्र निफाड यांच्याकडून शेतकर्‍यांसाठी बीजोत्पादन घेऊन बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याकामी केंद्राचे प्रमुख व गहू विशेषज्ञ डॉ.सुरेश दोडके, गहू पैदासकार डॉ.उदय काचोळे, गहू पैदास विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नीलेश मगर, कनिष्ठ गहू रोग शास्त्रज्ञ डॉ.भानुदास गमे, मृदविज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.योगेश पाटील, कीटक शास्त्र सहायक प्राध्यापक प्रा.भालचंद्र म्हस्के, कवकशास्त्रज्ञ डॉ.बबनराव इल्हे यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे.

वैशिष्टे:

  • उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल/हेक्टरी
  • तांबेरा रोगास प्रतिकारक
  • पक्व होण्याचा कालावधी ११०-११५ दिवस

हे देखील वाचा