सोलापूर : ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर पाणी फाउंडेशनतर्फे यंदा खरिप हंगामापासून ‘फार्मर कप’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शेतकर्यांचा पीकनिहाय गट राहणार असून राज्यस्तरावर प्रथम येणार्या गटास तब्बल २५ लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे.
सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत शेतकरी गट यांना सहभागी होता येणार आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून या स्पर्धेची सुरवात होणार आहे. यामध्ये २० शेतकर्यांचा मिळून एक गट तयार केला जाणार आहे. त्या पिकातील तज्ञांसह यशस्वी शेतकर्यांकडून त्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. उत्पादनासाठी आवश्यक असलेला बीजपुरवठा, पेरणी, औषधोपचार, काढणी या बाबींचे मार्गदर्शन ते देखील मोफत दिले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या शेतकर्यांना एकात्मिक कीडनियंत्रण असे प्रयोग राबवून रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी व्हावा तसेच विषमुक्त शेतीमाल उत्पादित करण्यावर फांउडेशनचा भर राहणार आहे.
आतापर्यंत वाटर कप स्पर्धेतून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. यामुळे पाणीपातळी वाढली असून अनेक गावे ही टँकरमुक्त झाली आहेत. आता शेतीमाल वाढीसह उत्पादनाच्या नव्या बाबी या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या निदर्शनास याव्यात या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.