नांदेड : एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी आयुक्त धीरज कुमार हे नांदेड दौर्यावर आले होते. दरम्यान, नांदेड-नागपूर महामार्गावरील पार्डी येथे शेतकर्यांनी त्यांचा ताफा अडविला. शेतकर्यांनी कृषी आयुक्तांचाच ताफा अडविल्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र धीरज कुमार यांनी गाडी खाली उतरुन शेतकर्यांच्य समस्या जाणून घेत त्या दूर करण्याचे आश्वासन दिले. बोगस बियाणे आणि लिकिंग खत या शेतकर्यांच्या प्रमुख समस्या होत्या.
आधीच पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पेरण्या लांबल्यामुळे उत्पान्नात तूट येण्याची भीती अनेकांना सतावत आहे. एकीकडे हे संकट असतांना खत विक्रेत्यांकडून शेतकर्यांची लूट होत आहे. डीएपी खत घ्यायचे असेल तर याच खताबरोबर दुसरे एक खत किंवा कृषी सेवा केंद्रातील अन्य वस्तू, साहित्य हे खरेदी करावे लागते. या लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. आधीच शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. यातच पेरण्या लांबणीवर गेल्या असताना अशा पध्दतीने शेतकर्यांची लूट होत आहे. लिंकिंगची पध्दत बंद करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस बियाणे कंपन्या आहेत. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. यात कृषी विभागाच्या काही अधिकार्यांनी आपले हात ओले केल्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या अधिकार्यांना निलंबित करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी कृषी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.