मुंबई : शेती परवडत नाही म्हणून अनेक शेतकरी काहीना काही जोडधंदा करतात. ढोबळमानाने पाहिल्यास शेळी पालन, पोल्ट्री फार्म, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला विक्री पलीकडे अन्य कोणताही जोड धंदा फारसा केला जात नाही. मात्र गुजरातमधील शेतकरी असा जोडधंदा करत आहेत ज्या माध्यमातून फारशी मेहनत न घेता दरवर्षी एक ते दीड लाख रुपयांची कमाई केली जाते.
गुजरातचे शेतकरी आता फक्त शेतीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आता गुजरातचे शेतकरी सौरऊर्जेच्या साहाय्याने वीज निर्मिती करत आहेत आणि त्याची विक्रीही करत आहेत. गुजरातमधील ढूंढी गावातून समोर आलेले हे चित्र देशातील इतर शेतकर्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. येथील शेतकर्यांनी ४.६३ रुपये प्रति किलोवॅट दराने ५ वर्षांत ३.५० लाख युनिट विजेची विक्री केली आहे.
कृषी संशोधन संस्था इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि टाटा प्रोग्राम यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत, ढूंढी सौर ऊर्जा सहकारी सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. यामार्फत डिसेंबर २०१५ मध्ये ढूंढी गावात काम सुरू केले. येथील शेतकरी सोलर पॅनलमधून निर्माण होणार्या विजेच्या साह्याने शेतात सिंचन करण्यासाठी पाण्याचे पंप चालवतात आणि उर्वरित वीज सरकारला विकतात. एका वर्षात या सौर पॅनेलमधून १ ते १.५ लाख उत्पन्न अनेक शेतकरी मिळवत आहेत.
आतापर्यंत ५ वर्षात या ढूंढी सौर ऊर्जा सहकारी संस्थेने ३.५० लाख युनिट वीज विकून १५ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळवले आहे. त्यासोबतच इतर शेतकर्यांना पाणी विकून १५ ते १६ लाखांची कमाई केली आहे. या मंडळातून शेतकर्यांनी ३० ते ३२ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे, असे म्हणता येईल. या गावातील शेतकर्यांचा हा प्रयोग अन्य शेतकर्यांना निश्चितपणे प्रेरणादायी ठरेल.