यवतमाळ : बनावट बियाण्यांची तक्रार शेतकर्यांमधून नेहमीच होत असते. बनावट बियाण्यांमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याच्या घटना प्रत्येक हंगामात समोर येतात. यासह बनावट खतांचीही विक्री होत असल्याने शेतकर्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते मात्र आता बियाणे व खतांपाठोपाठ बनावट किटकनाशकांचाही काळाबाजार समोर आला आहे. यामुळे शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग देखील अलर्टवर आला आहे. फसवणूक टाळण्यासाठी शेतकर्यांनी कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी, याबाबत कृषी विभागाने काही महत्त्वाच्या सुचनाही दिल्या आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात बनावट कीटकनाशक आणि खताचा साठा कृषी विभागाकडून जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ७ लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दोन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरात व तेलंगणा येथून अडीच लिटरच्या डब्यामध्ये बोगस किटकनाशक हे पांढरकवडा येथे दाखल होत असत. यातूनच वेगवेगळी पॅकिंगकरुन ते शेतकर्यांच्या माथी मारले जात होते. तर याच भागातून बनावट खतेही आणली जात होती. शेतकर्यांच्या अज्ञानाचा फायदा हे विक्रेते घेत होते. राज्यात अन्य ठिकाणीही अशा प्रकारे बनावट किटकनाशकांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यामुळे शेतकर्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
खत खरेदी करताना अशी घ्या काळजी
शेतकर्यांनी फसवणूक टाळण्यासाठी रीतसर आणि पक्की पावती घेणे गरजेचे आहे. शिवाय कृषी सेवा केंद्राची नोंदणी क्रमांक असलेलीच पावती, बियाणे किंवा खते यांचे पॅकिंगवर दिले तेवढेच वजन आहे का नाही याची तपासणी, साधे बील न घेता छापील पावतीच घेणे गरजेचे आहे. जे शेतकरी उधारीवर खत घेतात त्यांनाच सेवा चालक हे साधे बील देतात. त्यामुळे केवळ खरेदी करताना काळजी घेतली तर फसवणूक टळणार आहे.