जळगाव । आज प्रत्येकजण नोकरीच्या मागे धावतोय मात्र हैदराबादमधील एका तरुणीने कॉर्पोरेट कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्या जिद्द आणि चिकाटीने आपण घेतलेला निर्णय योग्य असल्याचे दाखवून देत तिने सेंद्रीय शेतीतून वर्षाला २० कोटी रुपयांची कमाई सुरु केली आहे. गितांजली नावाच्या या तरुणीची कहाणी देशातील तरुण शेतकर्यांना निश्चितच प्रेरणा देणारी आहे.
गीतांजलीने २००१ मध्ये बीएसस्सी आणि नंतर २००४ मध्ये पाँडिचेरी येथून आंतरराष्ट्रीय व्यवसायात एमबीए पूर्ण केले. यानंतर तिने १२ वर्षे क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्रीतमध्ये काम केले. गीतांजलीने टीसीएस कंपनीत ग्लोबल बिझनेस रिलेशनशिप मॅनेजर म्हणून बेटर इनकममध्ये काम केले आहे. २०१४ मध्ये तिने ही नोकरी सोडली कारण तिला काहीतरी वेगळे करायचे होते. पण त्याच दरम्यान तिचे लग्न झाले. तिच्या पतीने आणि कुटुंबाने तिला व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठिंबा दिला आणि २०१७ मध्ये तिला सेंद्रिय भाजीपाला विकण्याची कल्पना सुचली. त्यानंतर तिने स्वतःची शेती कंपनी सुरू केली.
सेंद्रीय पध्दतीने भाजीपाला व फळांचे उत्पादन घेवून ते ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी गीतांजलीने एक अॅप तयार केले आहे. यामाध्यमातून भाजीपाला व फळे ग्राहकांच्या घरी पोहचविले जातात. आज १६००० हून अधिक ग्राहक तिच्याकडून भाजीपाला खरेदी करतात. यामाध्यमातून आज गीतांजली दरवर्षी २० कोटी रुपये कमावते. लॉकडाऊनच्या वेळी जिथे लोकांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता, तिथे गीतांजलीच्या व्यवसायाने चांगला नफा कमावला होता.