शेत शिवार । काहीसा उशिरा का होईना मात्र पावसाने राज्यभरात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र हजेरी लावली आहे. यामुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट टळले आहे. असे असले तरी काही भागांमध्ये अजूनही पेरणीसाठी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकर्यांनी अजूनही घाई न करता ७५ ते १०० मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागाने शेतकर्यांना केले आहे. (Good Weather for Sowing)
खरिप हंगाम सुरु होण्याआधीच कृषी विभागाने किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय चाढ्यावर मुठ ठेवू नका, असे आवाहन केले होते. मात्र अनेकांनी पेरणीची घाई केली. धुळपेरणीमुळे काही भागांमध्ये दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अशाच २० जून उलटल्यानंतरही बेपत्ता असलेल्या पावसाने गत ४८ तासांपासून अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. दोन दिवसांपसून वातावरणात झालेला बदल हा आशादायी ठरत आहे. आता उशिरा का होईना खरिपासाठी पोषक वातावरण झाले असून राज्यभरात आठवड्यात पेरणी कामे अधिक गतीने होतील असा अंदाज आहे.
हे देखील वाचा : पावसासाठी पोषक वातावरण, वाचा काय आहे हवामान खात्याचा नवा अंदाज
खरीप हंगामात तेलबियांबरोबर कडधान्यावरही शेतकर्यांचा भर असतो. असे असले तरी राज्यातील शेतकरी हे सोयाबीन आणि कापसाचीच अधिक प्रमाणात लागवड करतात. पण यंदा निसर्गावर आधारित पेरणीचे स्वरुप राहणार आहे. सध्याच्या स्थितीमुळे कडधान्याचा पेरा उशीरा केल्यास अपेक्षित उतारा मिळत नाही. त्यामुळे आता तूर, उडीद आणि मुगाचा विषय संपल्यात जमा आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. लांबलेल्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी घाई गडबडीत पेरणी न करता किमान ७५ ते १०० मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.