अकोला : रब्बी हंगामात हराभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले. शिवाय बाजारभावापेक्षा हमीभाव जास्त असल्याने शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. मात्र उद्दिष्ठपूर्ती झाल्याचे कारण पुढे करत मुदतीपूर्वीच हमीभाव केंद्र बंद करण्यात आले. यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी हवालदिला झाले होते. मात्र या संकटात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत शेतकर्यांना दिलासा दिला आहे.
यंदाच्या रब्बीत हरभर्याच्या अधिकच्या उत्पादनामुळे खुल्या बाजारात हरभर्याला ४ हजार ५०० असा दर आहे तर हमी भाव हा ५ हजार २३० रुपये ठरवून देण्यात आला. १ मार्च सुरु झालेली खरेदी केंद्र २९ मे ला बंद होणार होते. पण उद्दिष्टपूर्ती आणि पोर्टलची समस्या निर्माण झाल्याने ही खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती. मुदतीपुर्वीच खरेदी केंद्र बंद झाल्याने हरभर्याचे काय करावे असा प्रश्न उपस्थित होत असताना अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बुधवारपासून खरेदी केंद्र ही सुरु झाली आहेत. त्यामुळे हरभर्याला ५ हजार ३०० हा आधारभूत दर मिळणार आहे. यामुळे शेतकर्यांचे नुकसान तर टळले आहे पण आता खुल्या बाजारपेठेतीलही दर वाढतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अकोला जिल्ह्यात बुधवारपासून खरेदी केंद्र सुरु झाले असून आगामी काळात १५ हजार क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसारच आता खरेदी केली जाणार आहे. शिवाय ज्या शेतकर्यांचा माल घेणे शक्य त्यांचीच अधिकृत नोंद केली जाणार आहे.