कृषि क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अनेक प्रगतिशील शेतकरी या बदलांच्या लाटेवर स्वार होत नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने भरघोस उत्पादन घेण्यात यशस्वी देखील होत आहेत. शेतकर्यांच्या यशाचे गुपित म्हणजे, अचूक शेती अर्थात प्रिसिजन फार्मिंग…
प्रिसिजन फार्मिंग म्हणजे भलतेच वेगळं काही आहे, असे मुळीच नाही. या पध्दतीत तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्याची एक अचूक पध्दत असते. बर्याचवेळा शेतकरी एकच चुक सातत्याने करो. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, शेजारच्या शेतकर्याने कापूस लावला तर मी देखील कापूसच लावेल, शेजार्याने मक्याची लागवड केल्यास मीही मकाच घेईन!, त्याने दोन थैल्या युरिया टाकाला की आपणही टाकायचा किंवा त्याने शेताला पाणी दिले की आपणही लगेच द्यायचे. अशा प्रकारची मानसिकता कमी अधिक प्रमाणात सर्वदूर दिसून येते. यामुळे शेतकर्यांचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होते. यासाठी आता या कॉपीकॅट पध्दतीच्या पलीकडे जाऊन नवीन तंत्रज्ञानाने शेती करण्याची वेळी आली आहे. यालाच आपण अचूक शेती असे म्हणू शकतो.
न्यू एज फार्मिंग प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काय?
शेतीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे अचूक शेती. त्यासाठी फारसे खत आणि पाणीही लागत नाही. यामध्ये सेन्सरच्या साहाय्याने आपल्या पिकांची गरज तपासली जाते, त्यानंतर तीच गोष्ट झाडाला किंवा पिकाला लावली जाते. हे सुरू करण्यापूर्वी माती तपासली जाते आणि त्या आधारे त्यामध्ये कोणते पीक पेरायचे, हे ठरवले जाते. मग शेतकरी हवामान, पाणी, जीवाणू इत्यादी सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपले पीक ठरवतो. त्यामुळे शेतमालाचा खर्चही कमी होऊन पर्यावरणाचीही हानी होत नाही. या तंत्राद्वारे झाडाला पाण्याची गरज असताना पाणी दिले जाते, जेव्हा खताची गरज असते तेव्हा खत दिले जाते आणि तेही पाईपच्या साहाय्याने झाडाच्या मुळाशी. त्यामुळे शेतकर्याचा खर्च कमी होऊन त्याचा नफा अनेक पटींनी वाढतो.
प्रिसिजन फार्मिंगचे फायदे:
प्रिसिजन फार्मिंगचे अनेक फायदे आहेत. याच्या मदतीने आपण सेन्सरच्या साहाय्याने वेळेवर उपचार करून पिकावरील रोग रोखू शकतो. त्याच्या मदतीने, पाणी आणि कीटकनाशके थेट झाडांच्या मुळांना दिली जाऊ शकतात. त्याच्या मदतीने आपण आपला खर्च कमी करू शकतो आणि उत्पादन वाढवू शकतो. यामुळे शेतकर्याचे उत्पन्न वाढते आणि त्याचे जीवनमान सुधारते. गरजेनुसार पाण्याचा वापर करता येतो. संपूर्ण शेतात पाणी सोडण्याची गरज नाही, आपण थेट झाडांच्या मुळांना पाणी देऊ शकता. पिकाचे उत्पादन दर्जेदार होते. त्याद्वारे उत्पादित केलेल्या पिकाचे दाणे सामान्य पद्धतीने घेतलेल्या पिकापेक्षा उजळ आणि चांगले असतात. मातीचा दर्जाही खराब नाही.
सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता
प्रिसिजन फार्मिंगच्या मदतीने इस्त्रायल, इथोपियासह अनेक देशांनी भरघोस उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र भारतात यात खूप अडचणी आहेत. मुख्य म्हणजे, भारतातील शेतकर्यांकडे असलेले क्षेत्रफळ हे तुकडा पध्दतीमुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. शिवाय येथील शेतकर्यांचे शिक्षण व आर्थिक परिस्थिती हे देखील मोठी आव्हाने आहेत. यासाठी प्रिसिजन फार्मिंगसाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आतापासून शेतकर्यांना प्रशिक्षणासह आर्थिक मदतीचा हात दिल्यास त्याचा भविष्यात निश्चितपणे मोठा फायदाच होईल.