जळगाव : जिल्ह्यात मृगच्या पावसाने जोरदार सलामी दिली आहे. यामुळे शेतकरी सुखावला असला तरी, वादळी वाऱ्यामुळे केळी बागा ह्या आडव्या झाल्या आहेत. केळी तोडणीला आली असतानाच हे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावल्याप्रमाणे सध्याची स्थिती आहे. जिल्ह्यात शेकडो एकरातील केळी बागा ह्या जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका भडगाव, चोपडा, अमळनेर, या तालुक्यातील उत्पादकांना बसलेला आहे. केळी हे फळपिक असल्याची घोषणा मध्यंतरीच राज्य सरकारने केली होती. त्यामुळे आता नुकसानभरपाईत याचा काही उपयोग होईल का? याकडे शेतकरी लक्ष लाऊन बसले आहेत.
हंगामाच्या सुरवातीला केळीच्या घटत्या दरामुळे शेतकरी चिंतेत होता. निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केळीची जोपासणा केली पण 400 ते 500 रुपये क्विंटल असा दर होता. शिवाय आता इतर फळपिके बाजारातून गायब होताच केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. हे सर्व असले तरी तोडणीला आलेली केळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झाली आहे.
जिल्ह्यातील रावेर यावल मुक्ताईनगर यासह जिल्ह्यात अनेक भागात केळी बागाचे नुकसान झाल्याने पालकमंत्री पाटील यांनी पीक पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पाच वर्षापासून जळगाव जिल्ह्यात सातत्याने वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे केळीच्या बागांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापन बदलण्याचा सल्ला दिला आहे.
विशेष म्हणजे तोडणीच्या दरम्यानच ही अवस्था होत असल्याने शेतकऱ्यांनी याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. याकरिता कृषी विभागाने केळी लागवडीचा कालावधी ते उत्पादन मिळेपर्यंतच्या दरम्यान काय बदल करता येतो का ? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाय आता केळीला फळपिकाचा दर्जा मिळाल्याने मदत आणि उत्पादनवाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.