मुंबई : केरळातून तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूनचा वेग पुन्हा मंदावला आहे. कोकणानंतर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ज्या वेगाने पावसाला सुरुवात झाली असली तरी पश्चिम महाराष्ट्राती काही जिल्हे व मराठवाड्यातील परभणी आणि जालना वगळता इतर जिल्ह्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे.
१० जून तळकोकणात मान्सूनचे आगमन झाले. त्यानंतर मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली. ११ जून रोजी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भागात दाखल झालेला मान्सून सोमवारी मात्र मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील परभणीपर्यंत हजेरी लावली आहे. आता मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे उर्वरीत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रही लवकरच व्यापला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्यातील काही विभागांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा असली तरी आगामी काळात पावसाला पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे बुधवार/गुरुवारपर्यत संपूर्ण मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच बंगालच्या उपसागराचा काही भाग हा व्यापून टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातही दोन-तिन तालुके वगळता सर्वच तालुक्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा लागून आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात सलग तिसर्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. असेच चित्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये कायम असले तरी येणार्या दोन-तिन दिवसात पाऊस सर्वदूर हजेरी लावेल, अशी अपेक्षा आहे.