Heavy Rain in Nashik : राज्यात अहमदनगरमध्ये शिर्डी, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे नदी नाले तुडूंब भरले असून शेतकर्यांच्या शेतामध्येही पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचीही दाणादाण उडाली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पावसाचे राज्यात पुनरार्गमन झाले असून नाशिकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तब्बल ३ दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. नाशिकच्या सिन्नर येथील पांगरी शिवारात अर्धा तास ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाने शेतीमध्ये तसेच परिसरात पाणी साचले. ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत.
महाराष्ट्रात ४८ तासांत पावसाचा इशारा
राज्यात सध्या सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. काही ठिकाणी पावसामुळे बळीराजा सुखावला आहे तर काही ठिकाणी दुबारपेरणीचे संकट आहे. अशात हवामान खात्याकडून पुढील ४८ तासात पुन्हा एकदा राज्याला मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.