पुणे : जून महिना उलटल्यानंतर जुलै उजाडला तरी पावासाची प्रतिक्षा संपलेली नाही. आज पाऊस येईल… उद्या पाऊस येईल…असे अंदाजांचेच पाऊस पडत आहेत. मात्र आता खरोखरच पावसाची प्रतिक्षा संपली आहे. सोमवारपासून कोकण आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असला तरी आगामी ५ दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यातच गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गेल्या महिन्याभरात सरासरीएवढा पाऊस झाला नसला तरी आता पावसाची प्रतिक्षा संपणार आहे. केवळ कोकणातच नाहीतर मराठवाड्यातही विजेंच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे. सोमवारपासून कोकण आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असला तरी ३ ते ८ जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. त्यामुळे जून महिन्यात पावसाची भासलेली उणीव या महिन्यात पूर्ण होईल का हे पहावे लागणार आहे.
पावसाच्या अनियमिततेमुळे पेरण्या रखडल्या आहेत. शेतकर्यांनी कडधान्याला बाजूला सारुन सोयाबीन आणि कापसावरच भर दिला आहे. असे असले तरी पावसाने दिलेली ओढ यामुळे पिकांची वाढ तर खुंटली आहेच पण अशीच स्थिती राहिली तर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. जुलै महिन्यातील पावसावरच खरिपाचे भवितव्य ठरणार आहे.