पुणे : गेल्या महिनाभरापासून हुलकावणी देणारा पाऊस जुलै महिन्यात समाधानकारक बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरवत सोमवारपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. गत २४ तासात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. हंगामात प्रथमच सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या पिकांना तर नवसंजीवनी मिळणार आहेच पण ज्या क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या होत्या त्याला देखील गती येणार आहे. पुढील ५ दिवस मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये उशिरा का होईना दणक्यात पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. शिरजगावात तर नालीतले पाणी नागरिकांच्या घरात घुसले आहे. तर मोझरीमध्ये सूर्यगंगा नदीला पूर आला आहे. शिवाय सबंध जिल्ह्यात सतंतधार पाऊस होत असल्याने खरिपासाठी हा पाऊस पोषक मानला जात आहे.
कोल्हापूरात सोमवारी रात्रीपासून झालेल्या पावसाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी २३ फुटांवर गेली असून राजाराम बंधार्यांसह ६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे केवळ खरिपासाठीच नाहीतर पाणीपातळी वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. आता कोल्हापुरातील शेती आणि मशागतीच्या कामांनाही वेग येण्याची शक्यता आहे. पुढच्या ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नांदेडमध्ये सर्वदूर झालेल्या या पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळालाय तर पेरणी राहिलेले शेतकरी आता लगबग करताना दिसणार आहेत. बुलडाण्यात दुबार पेरणीचे संकट टळले पावसाने ओढ दिल्याने आता दुबार पेरणी करावी लागते की काय अशी स्थिती होती. पण रात्रीत झालेल्या पावसाने चित्र बदलले आहे. पावसाच्या दमदार पुनरागमनाने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईसह उपनगरांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई उपनगरात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वांद्र्यासह काही भागात अद्यापही पाणी साचले आहे. वसई-विरार, नालासोपार्यात पावसाचा जोर कायम असून वसई-विरारमध्ये अनेक भागात पाणी साचलं आहे.