लासलगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध बाजार समितींमध्ये नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जात होती. यामुळे शेतकर्यांच्या कांद्याला चांगला दर मिळत होता. मात्र, आता कांदा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे सोमवारपासून नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाणार नाही. त्यामुळे त्याचा दरावर कसा परिणाम होतो? याकडे शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.
यंदा अडीच लाख मेट्रिक टन कांद्याचे खरेदीचे उद्दिष्ट नाफेडने ठेवले होते. १६ एप्रिल पासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात येथील काही बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू होती सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला सरासरी १ हजार २०० तर कमाल १ हजार ४३६ रुपये दर मिळला आहे. रब्बी हंगामातील कांद्याची काढणी होताच दरात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे नाफेडच्या माध्यमातून का होईना दिलासा मिळेल असा दर शेतकर्यांना मिळालेला आहे. मात्र, उद्दिष्टपूर्ण झाल्यामुळे सोमवारपासून कांदा दराचे चित्र काय राहणार हे पहावे लागणार आहे.
भविष्यात कांद्याला अधिकचा दर मिळेल म्हणून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे कांदा चाळीत कांदा साठवणूकीवर भर देतात. यंदा नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरु असताना देखील अनेक शेतकर्यांनी साठवणूकीवर भर दिला होता. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी व संततधार यामुळे कांदा चाळीत साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे.