मुंबई : दिवाळी तोंडावर आली असतांनाच गोकुळ दूध संघाने म्हशी व गायीच्या दूध खरेदी दरात वाढ करत दूध उत्पादकांना दिवाळीची भेट दिली आहे. नव्या दरांप्रमाणे आता म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली आहे. तर गाईच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर आता म्हशीला प्रति लिटर ४७.५० पैसे तर गाईला प्रति लिटर ३५ रुपये दर मिळणार आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
दुसरीकडे म्हशीच्या दूध विक्री दरातही ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आधी म्हशीच्या एक लिटर दुधाचा दर कोल्हापूरमध्ये ६० रुपये होता. तो आता ६३ रुपये इतका झाला आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत ३० रुपयांवरुन ३२ रुपये इतकी झाली आहे. मुंबई, पुण्यात एक लिटर म्हशीच्या दुधाची किंमत ६६ रुपयांवरुन आता ६९ रुपये झाली आहे. तर अर्धा लिटर म्हशीच्या दुधाची किंमत ३३ रुपयांवर ३५ रुपये इतकी झाली आहे.