लातूर : यंदा कधी नव्हे राज्यातील शेतकर्यांनी उन्हाळी सोयाबीनचा प्रयोग केला होता. पाण्याची उपलब्धता आणि पोषक वातावरण यामुळे उन्हाळी सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घट होत होती. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र गत चार दिवसात असे चित्र बदलले आहे की, सोयाबीनीच्या दराला लागलेली घसरगुंडी केवळ थांबलेलीच नाही तर ४०० रुपयांनी त्यात वाढ देखील झाली आहे.
ज्या शेतकर्यांनी सोयाबीनचा साठा केला किंवा ज्यांना उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन झाले त्यांचा बाजार उठलाच असे काहीसे वातावरण गेल्या आठवड्यात बाजारपेठेत झाले होते. केवळ सोयाबीनच्याच दरात घट नाही तर तूर आणि हरभर्याचेही दर घसरले होते. ऐन खरिपाच्या तोंडावर शेतीमालाचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये सोयाबीनचे दर हे ४०० रुपायांनी वाढले आहेत.
प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने हा बदल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात ४०० रुपयांची वाढ ही शेतकर्यांसाठी दिलासादायक बाब असून गुरुवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ६ हजार ८०० असा दर मिळाला होता. ७ हजार रुपये क्विंटलवर असलेले सोयाबीन थेट ६ हजारांवर येऊन ठेपले होते. त्यामुळे साठवलेल्या आणि उन्हाळी हंगामातील सोयाबीनचे काय होणार असा सवाल उपस्थित होत असताना बाजारपेठेत अमूलाग्र बदल होत आहे.
सोयाबीनच्या दरात वाढ झाली असली तरी दुसरीकडे हरभरा आणि तुरीच्या दरात घट ही कायम आहे. राज्यातील हरभरा खरेदी केंद्र बंद केल्याने आता खुल्या बाजारपेठेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आवक वाढली की हरभर्याच्या दरात यापेक्षा घट होईल असा अंदाज आहे. तर तुरीला ६ हजार ३०० हमीभाव असताना बाजारपेठेत ६ हजार दर मिळत आहे. सध्या खरिपामुळे आवक घटली असली तरी दरात सुधारणा झालेली नाही. मात्र, सोयाबीनच्या वाढत्या दरामुळे वातावरण बदलले आहे.