नांदेड : यंदा खरीप हंगामावर पहिल्या दिवसापासून संकटांचे वादळ घोंगावत आहे. जून महिन्यात पेरण्या केल्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. परिणामी अनेक भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले. काही ठिकाणी उशिरा पेरण्या झाल्या. त्यानंतर जुलै महिन्यांपासून दीड महिला सतत पाऊस सुरु होता. यामुळे जास्त पाण्यामुळे पिकं सडू लागली. या अतिवृष्टीतून सावरलेल्या पिकांवर कीडरोगांचा प्रादूर्भाव झाला आहे. मोठा फटका सोयाबीन या पिकाला बसत आहे.
सोयबीन हे पीक आता फुलोर्यात आले आहे. मात्र, पावसाने दिलेली ओढ आणि आता केवडा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकर्यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे. फुलोर्यात असताना वातावरण पोषक राहिल्यास उत्पादनात वाढ होते पण आता पाण्याची आवश्यकता आणि त्यातच केवड्याचा प्रादुर्भाव यामुळे थेट उत्पादनावर परिणाम होईल असे बोलले जात आहे. सध्याचे ढगाळ आणि दमट वातावरणामुळे या रोगाच्या विळख्यात सोयाबीन सापडले आहे. त्यामुळे जोमात असलेले पीक पुन्हा कोमात जाऊ नये म्हणून शेतकरी अधिकचे पैसे खर्ची करुन फवारणी कामावर भर देत आहे.
केवड्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लागवडीसाठी उपलब्ध असलेले प्रमाणित प्रतिकारक बियाणे गरजेचे आहे. दाट लागवड किंवा जास्त खते देणे टाळावे लागणार आहे. किमान एक वर्षासाठी तरी सोयाबीनचा इतर पिकांची फेरपालट केल्यास केवडा रोगाची घटना कमी होऊ शकतात. पुढील वर्षात हे रोग होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी संक्रमित पिकाचे अवशेष गाडून टाकावे लागणार आहे.