नंदूरबार : वाढती महागाई व निसर्गाच्या लहरीपणामुळे आजकाल शेती परवडत नाही, अशी व्यथा अनेक शेतकरी मांडतात. मात्र एक महिलेने माळरानावर अमराईसह शेती फुलवून दाखविली आहे. रजनीताई कोकणी नावाच्या या महिला शेतकर्याच्या जिद्दीची कहाणी हजारो शेतकर्यांना प्रेरणा देणारी ठरत आहे.
निंबोणी गावात रजनीताई कोकणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडील शेती माळरानाची. खडकाळ, टेकड्यांची आणि मुरबाड असल्याने तेथे सिंचनाची कोणतीही सुविधा नाही. रजनीताई यांनी अशा पीरस्थितीतही शेतीचा ध्यास घेतला आणि शेती फुलविण्याचा निर्धार व्यक्त केला. कुटूंबातील सदस्यांच्या मदतीने आधी शेतीचे सपाटीकरण करून घेतले. वेळप्रसंगी स्वत:च हातात कुदळ घेवून श्रमाची कामे केली. त्यांच्या अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर जमीन कसण्यालायक झाली. त्यांनी सुरवातीला पावसाच्या पाण्यावर आधारित कोरडवाहू शेती केली. त्यानंतर त्यांनी विहीर खोदून सिंचनाची शास्वत व्यवस्था निर्माण केली.
या शेतात आता त्या गहू, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, इत्यादी पिके त्या घेऊ लागल्या आहेत. तसेच कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, वांगे, मिरची, वाल- पापडी आदी भाजीपाला पिकांचे उत्पादनही त्या घेवू लागल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी भाताच्या इंद्रायणी या वाणाची सुधारित तंत्रज्ञानाच्या आधाराने लागवड करून भात उत्पादनही घेतले आहे. शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणार्या राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प अंतर्गत त्यांनी एक एकर क्षेत्रात आंबा लागवडीचा वाडी प्रयोग उत्कृष्टपणे राबविला आहे. त्यांनी उत्तम प्रजातीच्या आंब्याच्या ५० झाडांचे संगोपन केले आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले असून परिसरासाठी एक उत्कृष्ट असे मॉडेल तयार केले आहे.
शेताच्या बांधावर सागाच्या दोनशे रोपांची लागवड केली आहे. सोबत बांबू, नारळ, चिकूच्या रोपांचीही लागवड केलेली आहे. आता चांगल्या प्रतीचे चिकू येवू लागले आहेत. भाजीपाल्याच्या नियोजनबद्ध लागवडीतून वर्षभर उत्पन्नाचा त्यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार त्या विविध भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. रजनीताई या आदिवासी शेतकरी महिलेचे शेतीतील कार्य इतर शेतकरी व महिलांसाठी आदर्शवत ठरले आहे.