जळगाव : महाराष्ट्रात केळीचे (Banana) सर्वाधिक उत्पादन जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून होते. जळगावच्या केळीला केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून केळीचे व्यापारी शेतकर्यांच्या मागे धावत आहेत. शेतांमध्ये व्यापारी व ट्रक रांगा लावून उभे आहेत. जळगाव जिल्ह्यात हरियाणा, मध्य प्रदेश, काश्मीर येथून केळी घेण्यासाठी ट्रक दाखल झाले आहेत. मात्र व्यापार्यांना केळीसाठी १५-१५ दिवस वेटिंगवर उभे राहवे लागत आहे. विक्रमी भाव देवूनही व्यापार्यांना केळी मिळत नाहीए. वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे ही स्थिती ओढावली आहे.
यंदा जळगाव जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम थेट उत्पादनावर झालेला आहे. गतवर्षी झालेल्या अवकाळीचा परिणाम आता उत्पादनावर आणि पिकावर दिसून येत आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे केळीवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला होता. शिवाय नंतरच्या उन्हामध्ये बागा करपल्या होत्या. या सर्वांचा परिणाम केळी दरावर झाला आहे. वाढलेली मागणी आणि घटलेले उत्पादन याचा परिणाम थेट शेतकर्यांच्या अर्थकारणावर होत आहे.
व्यापारी वाढीव दराने केळी खरेदीला तयार आहेत. सध्या केळी २२ ते २४ रुपये किलो असा दर असतनाही केळी उपलब्ध होत नाही. विक्रमी दर मिळत असला तरी उत्पादनातच घट झाल्याने शेतकरीही हताश आहे. हंगामाच्या सुरवातीला किमान उत्पादनावर झालेला खर्च पदरी पडावा म्हणून व्यापारी आणि शेतकर्यांनी एकत्र येऊन केळीचा दर ठरविला होता. असे असतानाही व्यापार्यांनी मनमानी करीत कवडीमोल दरात केळीची खरेदी केली होती. पण आता याच व्यापार्यांना रांगेत उभे राहून केळी खरेदी कऱण्याची नामुष्की ओढावली आहे. केळी खरेदीसाठी ट्रान्सपोर्टवर ४०० ते ५०० ट्रक ह्या उभ्या आहेत.