पुणे : महाराष्ट्रात मान्सून अद्यापही दाखल झालेला नाही. गत आठवडाभरात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असली तरी हा पाऊस मान्सूनपूर्व आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे. याच दरम्यान सर्वात मोठी माहिती म्हणजे, १०० मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करुन नये असा सल्ला कृषि विभागाने दिला होता. पण योग्य प्रमाणात जमिनीत ओल आणि ७५ मिमी पाऊस झाला तरी चाढ्यावर मूठ ठेवण्यास हरकत नसल्याचे मत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केले आहे. याकडे शेतकर्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यामुळे शेतकर्यांनी पेरणीपूर्व कामे गतीने पूर्ण केली मात्र १० जून उजाडल्यानंतरही मान्सूनचे आगमन झालेच नाही. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार येणार्या २४ तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल व त्यानंतर पुढील सात ते आठ दिवसात त्याची व्याप्ती वाढेल. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पेरण्यांबाबत शेतकर्यांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. आधीच दोन वर्षांपासून या-ना त्या कारणांमुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे यंदाच्या खरिप हंगामात योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
१०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या न करण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले होते. कारण शेतकर्यांनी जमिनीत ओलावा नसताना पेरणीची घाई केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्यांचे अंकुरण होणार नाही व शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावेल. खरीप हंगामातील सर्व पिके जमिनीत पुरेशी ओल चार ते सहा इंच खोल जमीन ओली झाल्याची खात्री करूनच पेरणी केली तरच फायद्याचे राहणार आहे.
कृषि विद्यापीठाच्या नव्या आवाहनानुसार, ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडून जमिनीतील ओल चार ते सहा इंच खोल जाणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी पेरणी करण्यापूर्वी पुरेसा पाऊस पडल्यानंतर जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी. अन्यथा आगोदरच उशिर आणि त्यात पुन्हा पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते.