Kisan Credit Card Documents : शेतकऱ्यांना बी-बियाणे, कीटकनाशके, खते, सिंचन आणि कृषी उपकरणे इत्यादींसाठी पैशांची गरज असते. बँकाकडून कर्ज मिळविण्यासाठी शेतकर्यांना बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. शेवटी हतबल होवून शेतकरी खासगी सावकारांकडून चढ्या व्याजदराने कर्ज घेतात, कर्जाची रक्कम वेळेवर न चुकवल्यास सावकार पैशांसाठी तगादा लावतो. या जाचाला कंटाळून शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल देखील उचलतो. शेतकर्यांची ही समस्या लक्षात घेऊन सरकारने शेतकर्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना आखली असून, त्याद्वारे शेतकर्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जात असून या योजनेवर अर्ज करण्यासाठी शेतकर्यांना फक्त तीन कागदपत्रांची आवश्यकता असेल.
हे देखील वाचा : Kisan Credit Card Loan : किसान क्रेडिट कार्डवरुन मिळवा तीन लाखांचे कर्ज; वाचा सविस्तर
किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकर्यांना कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. आधी किसान क्रेडिट कार्डची प्रकिया अत्यंत किचकट मानली जात होती. मात्र आता यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डचा लाभ केवळ शेतीपुरता मर्यादित नाही तर मच्छीमार, पशुपालक यांना या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम मिळू शकते. अर्जदाराचे वय १८ ते ७५ वर्षे दरम्यान असावे. त्यामुळे भाड्याच्या जमिनीवर शेती करणार्या शेतकर्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
आता किसान क्रेडिट कार्ड पीएम किसान योजनेशी जोडले गेले आहे आणि त्याच वेबसाइटवर किसान क्रेडिट कार्ड अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. आता किसान क्रेडिट कार्डमध्ये अर्ज करण्यासाठी फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो आवश्यक आहे. त्यानंतर शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळू शकेल. किसान क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत. या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ ७ टक्के व्याजदराने उपलब्ध आहे. तसेच जे शेतकरी कर्जाची रक्कम वेळेवर परत करतात, त्यांनाही तीन टक्के सवलत दिली जाते. म्हणजेच फक्त ४ टक्के दरानेही शेतकर्यांना कर्ज मिळू शकते. ही कर्जाची रक्कम शेतकर्यांना ५ वर्षांपर्यंत दिली जाते.