नाशिक : शेतमालाला योग्य बाजारपेठे मिळत नाही, अशी ओरड नेहमीच होत असते. अनेकवेळा व्यापार्यांकडून शेतकर्यांची लूट होते. याकरिता शेतकर्यांना त्यांचा शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ असावी, अशी मागणी सातत्याने होत असते. याच अनुषंगाने भाजीपाला आणि फळ उद्योगाला चालना देण्यासाठी नाशिकला अत्याधुनिक ‘कृषी टर्मिनल’ उभारण्यात येणार आहे. याचा फायदा फळभाज्या, अन्नधान्य, पोल्ट्री पदार्थ व दुग्धजन्य पदार्थांना होईल. शिवाय कच्च्या मालाचे नुकसान टळणार असून उद्योजकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
शेतकरी शेतमाल पिकवत असला तरी त्याचा भाव ठरविण्याचा अधिकार त्याचा नसतो. बाजारपेठेचे गणित व व्यापारी हा भाव ठरवतात. कृषी टर्मिनलमुळे आता या शेतकर्यांच्या मतालाही भाव मिळणार आहे. या कृषी टर्मिनलमुळे शेतकर्यांचा थेट बाजारपेठेशी संबंध येणार आहे. त्यामुळे उत्पादनाच्या विक्रीस पर्यायही उपलब्ध होणार आहे. शेतकर्यांच्या सहभागामुळे मध्यस्ती असलेली साखळी ही कमी होणार असून शेतकर्यांबरोबर ग्राहकांना देखील याचा फायदा होणार आहे.
नाशिकमध्ये उभारण्यात येत असलेल्या कृषी टर्मिनल माकेर्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स लिलाव पद्धत, कोल्ड स्टोरेज, बँकिंग, टपाल, हॉटेल, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी सेवा सुविधा उपलब्ध असतील. नाशिक विकास पॅकेज अंतर्गत २००९ मध्येच या प्रस्तावाला मान्यता मिळाली होती. आता याच्या कामाला मुहूर्त मिळणार आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात बैठक पार पडली. नाशिक जिल्ह्यातील कृषी टर्मिनल मार्केट उभारणीसाठी मौजे पिंप्री सय्यद येथील गट क्र.१६५४ मधील शासन मालकीच्या जागेपैकी १०० एकर जमीन हस्तांतरीत करून पुढील कार्यवाहीस सुरवात करावी असे आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत.