हिंगोली : शेतकर्याची सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणारं एका चिमुकल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंगोलीतील शाळेत शिकणार्या शेतकर्याच्या मुलाने हे पत्र लिहिलं आहे. या वर्षी सुद्धा शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची भरपाई दिवाळी आगोदर मिळावी, कारण त्याला दिवाळीला पुरणपोळी खायची आहे. विशेष म्हणजे त्या चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांनाही पुरणपोळी खाण्याचे आमंत्रण दिले आहे.
हिंगोलीतील गोरेगाव येथील सहावी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी प्रताप कावरखे याने हे पत्र लिहिलं आहे. या वर्षी शेतातील सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झालं आहे. त्यामुळे खर्चाला सुद्धा पैसे मिळत नाहीत. दसर्याला आईने पुरणपोळ्या केल्या नाहीत. इथे विष खायला पैसे नाहीत तर पुरणपोळी कुठे करणार असं आई म्हणत आहे. बँकेचे अनुदान आले की दिवाळीला पुरणपोळी करु, असं आई म्हणते. गावाजवळील एका गावात शेतकर्याच्या मुलाने वडिलांना खाऊसाठी पैसे मागितले तर त्याच्या वडिलांनी फाशी घेतली. म्हणून मी बाबाकडे पैसे मागत नाही. परंतु मुख्यमंत्री साहेब आमच्या घरी पाहा की, तुम्ही या अनुदानाचे पैसे लवकर द्या मग आई दिवाळीला पोळ्या करते. तुम्ही या पोळ्या खायला, असं या चिमुकल्याने पत्रात लिहिलं आहे.
चिमुकल्याचे पत्र वाचा त्याच्याच शब्दात
एकनाथ शिंदे
सायेब, मंत्री, मूंबई
माहे बाबा शेती करतात. आमच्या घरी शेती कमी हाय, असं बाबा म्हनतात. मी बाबाले म्हणल की मले गूपचूप खायले पैसे द्या म्हया संग भांडन करतात. म्हनतात यावर्षी सगळी सोयाबीन गेली, वावर इकतो देतो तूले दहा रुपये. आईन दसर्याले पूरणाच्या पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथ इश खायला पैसे नाहीत. वावरातली सोयाबीन गेली. महे बाबा दुसर्याच्या कामाले जातात. मी आईला म्हणत आपल्याले दिवाळीले पोळ्या कर ती म्हणे की बँकेत अनूदान आलं की करु पोळ्या. सायब आमच्या घरी सनाल्या पोळ्या करायले पेसे नाहीत. आम्हाले घर नाही, आम्हाले काहीत नाही. मी बाबा संग भांडन केलं की ती आई म्हणे आपल्या जवळच्या जयपूरच्या गावात शेतकरी त्याच्या पोरान पेसे माघतल्या मनून फासी घेतली आता मी बाबाले पेसे नाहीत मागत. सायेब आमच घर पाहा की तूम्ही या आनूदानचे पेसे लवकर द्या. मग दिवाळीले आई पोळ्या करते. तूम्ही या पोळ्या खायले, सायेब
तुमचा आणी बाबाचा लाडका
प्रताप कावरखे, वर्ग ६
जी.प. शाला गोरेगाव
हींगोली