संत्रा बागेच्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी हे करा

- Advertisement -

नागपूर : विदर्भातील नागपूर संत्रा उत्कृष्ट स्वाद, चव व आकर्षक नारिंगी फळ भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध आहे. संत्रा हे पोषक, उत्साहवर्धक, स्वादिष्ट व स्वास्थवर्धक फळ असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या संत्रा बागांपेकी फारच कमी बागा शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या आढळतात. संत्रा बागेला खते व पाणी देण्याचे तसेच किडी व रोगांच्या नियंत्रणाचे व्यवस्थापन फारच कमी बागायतदार करतात. त्याला अनेक कारणे कारणीभूत असली तरी तांत्रिक माहितीचा अभाव हे एक प्रमुख कारण आहे. यामुळे बहुतेक संत्रा बागांचा -हास हा अपेक्षित उत्पादन देण्यापूर्वीच झालेला पाहावयास मिळतो.

बहाराचे नियोजन

साधारणत: फळझाडांना ऋतु बदलताना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या नवीन पालवीस नवती असे संबोधण्यात येते. ही नवती वर्षातून तीन वेळा म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी, जून-जुलै आणि सप्टेंबरऑक्टोबर या महिन्यात येते. त्याचप्रमाणे संत्र्यालासुद्धा वर्षातून ३ वेळा नवती येते. या नवतीसोबत फुले सुध्दा येतात परंतु प्रामुख्याने फुले ही दोन वेळा येतात. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येणारी आंबिया बहाराची तर जूनजुलै मध्ये येणारी मृगबहाराची फुले असतात. संत्र्याची झाडे जमिनीतून

मिळणारे अन्नद्रव्य आणि पाणी सतत शोषून घेत असतात आणि यामुळे या क्रियेत अडथळा निर्माण करून झाडाची वाढ थांबवून झाडास विश्रांती द्यावी लागते. त्यामुळे संत्रा झाडाच्या वाढीकरिता लागणारी अन्नद्रव्ये वाढीकरिता खर्ची न होता या अन्नद्रव्याचा संचय झाडाच्या फांद्यामध्ये प्रमाणबद्ध झाल्यावर पोषक हवामान मिळताच बहाराची फुले नवीन नवती सोबत दिसू लागतात.

संत्रा मृग बहाराच्या समस्या आणि उपाय खाली दिलेले आहे.

नवीन संत्रा लागवड

नवीन संत्रा लागवड करावयाची असल्यास संत्र्याकरिता योग्य असलेल्या जमिनीमध्ये लागवड करावी. मध्यम पोताची १ ते १.५ मीटर खोलीची उत्तम निचरा होणारी आणि चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असलेल्या जमिनीमध्ये लागवड केलेली असावी. परंतु भारी जमिनीमध्ये संत्रा लागवड झालेली आहे, त्या जमिनीचा पोत सुधारण्याकरिता भरपूर सेंद्रीय खताचा वापर दरवर्षी करावा. दरवर्षी प्रत्येक संत्रा झाडाला ४0 ते ५0 किलो शेणखत आणि ७.५ किलो निंबोळी ढेप टाकावी. तसेच संत्राबागेत हिरवळीची खते गवताचा ५ सें.मी. चा थर देऊन आच्छादित करावा, त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव सक्रिय होऊन अन्नद्रव्ये मुळांना सहज उपलब्ध होतात. ८ ते १० किलो ट्रायकोडर्मा बुरशी, ५० ते ६० किलो शेणखतात मिसळून १ हेक्टर क्षेत्रात संत्रा बागेतील मातीत मिसळून द्यावी. बागेत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता उताराच्या दिशेने दोन झाडाच्या मध्ये चर खोदून पाणी बागेच्या बाहेर काढावे. चुनखडीचे प्रमाण अधिक असल्यास संत्रा बागेत जिप्समचा वापर करावा.

संत्रा झाडांना योग्य ताण देणे

संत्रा बागेला मृगबहार येण्याकरिता पाण्याच्या ताणाचा कालावधी जमिनीच्या मगदुरावर अवलंबून आहे. मध्यम पोताची १ ते १.५ मीटर खोलीच्या जमिनीमध्ये लागवड केलेल्या बागेला ५० दिवसांचा ताण मृगबहार घेण्याकरिता योग्य आहे. हलक्या जमिनीमध्ये १५ ते २० दिवसांच्या ताणाने सुध्दा संत्राबागा मृगबहाराने बहरल्याचे दाखले आहेत. तसेच भारी जमिनीमध्ये लागवड केलेल्या संत्रा बागेला ६० ते ७० दिवसांचा ताण देऊन सुध्दा मृगबहार न आल्याचे आढळले.

मध्यम उत्तम निच-याच्या जमिनीमध्ये लागवड केलेल्या बागांना ३0 दिवसाच्या पाण्याचा ताण देणे योग्य ठरेल.

मृगबहारकरिता खत व्यवस्थापन

मृगबहार येण्याकरिता प्रति झाडास ५० किलो शेणखत उन्हाळ्यात टाकून वखरणी करावी. जून महिन्यात मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर ताण तोडतेवेळी प्रति झाडास ६00 ग्रॅम नत्र + ४00 ग्रॅम स्फुरद + ४00 ग्रॅम पालाश + ७.५ किलो निंबोळी ढेप देण्यात यावी तसेच संत्रा बागेतील जमिनीत जस्ताची कमतरता असल्यास या खताच्या मात्रेसोबत झिंक सल्फेट २०० ग्रॅम प्रति झाड मातीत मिसळून द्यावे. उरलेली नत्राची अधीं मात्रा (६ooग्रॅम) फळे वाटाण्याएवढी झाल्यावर किंवा फळधारणा झाल्यावर १.५ ते २ महिन्यांनी ऑगस्टमध्ये देण्यात यावी

मृगबहाराकरिता ओलीत व्यवस्थापन

मृगबहाराची फुले येण्याकरिता संत्राबागेत जून-जुलैमध्ये जमिनीत भरपूर ओलावा असणे जरुरीचे आहे. मृगाच्या अपु-या पावसामुळे ओलावा कमी पडतो आणि ती कमतरता भरून काढण्याकरिता ओलिताची गरज असते. अशा वेळेस त्वरित आोलीत सुरू करावे. या कालावधीत ठिबक सिंचनाद्वारे केलेले ओलीत अधिक फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे बहार धरण्याच्या कालावधीत तुषार पद्धतीने ओलीत करणे सुध्दा फायदेशीर आहे. कारण तुषार सिंचन पद्धतीने ओलीत केल्यामुळे संत्राबागेत हवेतील आद्रतेचे प्रमाण ७० ते ८० टक्के टिकून राहील. त्यामुळे मृगबहाराची फुले येतील आणि फलनक्रिया सुध्दा अधिक प्रमाणात आढळून येईल.

मृगबहार घेण्याकरिता संजिवकाचा उपयोग

संत्रा झाडाची वाढ थांबविण्याकरिता जसा पाण्याचा ताण द्यावा लागतो, त्याचप्रमाणे काही संजीवकांनीसुद्धा झाडाची वाढ थांबविता येते. संत्रा झाडाला ताणावर सोडताना १ooo पी.पी.एम. सायकोसील या वाढरोधक संजिवकाची फवारणी करावी. त्यामुळे मृग बहाराची फुले आल्याचे प्रयोगावरून निदर्शनास आले आहे. तसेच ताणाच्या कालावधीत अकाली पाऊस पडल्यास लगेच दुस-या दिवशी १000 पी.पी.एम. सायकोसीलची दुसरी फवारणी केल्यास मृगबहार आल्याचे आढळून आले.

मृगबहार घेण्याकरिता काही आवश्यक बाबी

  • संत्र्याची लागवड योग्य जमिनीत करावी.
  • पावसाच्या पाण्याचा निचरा त्वरित करावा.
  • संत्रा झाडाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे माफक ताण द्यावा.
  • मृगबहार येण्याच्या कालावधीत पावसाचा खंड किंवा अपुरा पाऊस झाल्यास त्वरित ओलीत करावे.
  • ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास वनस्पती वाढरोधक १ooo पी.पी.एम. सायकोसीलची फवारणी करावी. बहार धरण्याच्या कालावधीत बागेत जमिनीच्या मशागतीची उदा.वखरणी, उष्करी इत्यादी कामे कस्त नयेत
  • खालावलेल्या सलाटलेल्या संत्रा झाडाची छाटणी करावी
  • शिफारशीनुसार खत आणि ओलीत व्यवस्थापन करावे. सेंद्रीय खताचा नियमित वापर करावा.
  • मृग बहाराच्या फळांची काढणी ३१ मार्चच्या आत करावी.
  • मृगबहाराची ८00 ते १000 फळे प्रति झाड घ्यावीत.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

हे देखील वाचा