…म्हणून दूध उत्पादक, पशुपालक मेटाकुटीला

- Advertisement -

नाशिक : शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून पशुखाद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गाई-म्हशीच्या खाद्य व चार्‍याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दुसरीकडे दुधाचे दर मात्र वाढले नाहीत. यामुळे दूध उत्पादक, पशुपालक मेटाकुटीला आले आहेत.

एक गाय किंवा म्हशीला प्रतिदिन ३५० ते ४०० रुपयांचे खाद्य लागते. इतर खर्च, मेहनत वेगळी. दुधातील फॅट व स्निग्धतेनुसार डेअरीवर म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ४० ते ५० रुपये दर मिळतो, तर गायीच्या दुधाला २५ ते ३५ रुपये दर मिळतो. बाहेर विक्री केल्यास दोन्ही दुधाला ४०-५० रुपये दर मिळतो. दूध उत्पादकांना गोळीपेंड, सुग्रास, सरकी पेंडचे पोते १० वर्षांपूर्वी ३८५ रुपयांला मिळत होते. आता तेच गत दोन वर्षांत ९६० रुपयांवरून १,२५० रुपये व आता तर चक्क १,६५० रुपयांवर पोहोचले.

बाजारपेठेत गहू, मका, तूर, सोयाबीन भुसा, सरकी पेंड, तूर कळणा या पूरक पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. मका, मकाचुनी, कडवळही महागले आहे. ओल्या व सुक्या वैरणीचा प्रश्नही दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे. मात्र, दुधाचा दर वाढत नसल्याने दूध व्यवसाय परवडेनासा झाला आहे.

हे देखील वाचा