ठाकरे सरकारमुळे बियाणांच्या किंमतीमध्ये चार पटीने वाढ; या आमदाराने डागली तोफ

ravi rana

अमरावती : महाबीजच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकर्‍यांना बियाणांचा पुरवठा केला जातो. मात्र, महाबीजचे खच्चीकरण करुन इतर खासगी कंपन्यांना वाव देण्याचा घाट ठाकरे सरकारकडून केला जात असल्याचा आरोप आ. रवी राणा यांनी केला आहे. शेतकरी अडचणीत असतानाच बियाणांच्या किंमतीमध्ये चार पटीने वाढ केली आहे. त्यामुळे पेरणी करणेही अवघड झाले असून शेतकर्‍यांबद्दलही या सरकारच्या मनात सहानभुती राहिली नसल्याचा आरोप आ. राणा यांनी केला आहे.

महाबीजकडून शेतकर्‍यांना अनुदानाच्या स्वरुपात बियाणे उपलब्ध होते. त्यामुळे शेतकर्‍यांना अधिकचा पैसा खर्च करावा लागत नाही. मात्र, ऐन हंगामात शेतकर्‍यांना बियाणे उपलब्ध होत नाहीए. काही शेतकरी ज्यादा दराने बियाणे खरेदी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांमुळेच खासगी कंपन्यांची मनमानी वाढत असल्याचा आरोप आ.राणा यांनी केला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना मागणीपेक्षा कमी बियाणांचा पुरवठा करुन शेतकर्‍यांची अडचण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मान्सूनपूर्व पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावल्याने खरीप हंगामाची लगबग सुरु झाली आहे. खत- बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांनी सुरवातही केली आहे. असे असताना अमरावती जिल्ह्याला मागणीच्या तुलनेत नगण्य पुरवठा झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा उद्देश हा शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याचा आहे की कमी करण्याचा असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे राणा म्हणाले.

या कंपनीचे खच्चीकरण करुन इतर खासगी कंपन्यांना वाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अधिकच्या रकमेने बियाणे खरेदी करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे सरकार शेतकर्‍यांच्या हिताचे नसून अन्यायकारक असल्याचा घणाघातही आ. रवी राणा यांनी केला आहे.

Exit mobile version