शेत शिवार । नवी दिल्ली : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांचे प्रत्येक हंगामात नुकसान होत असते. काही शेतकरी पॉलीहाऊससारखे प्रयोग करतात मात्र कुणी घरातच शेती केल्याचे ऐकवित नाही. परंतू एका महिलेने घराच्या रिकाम्या खोलीत मशरुमची शेती (Mushroom Farming) करत वर्षभरात तीन लाखांचे उत्पन्न घेण्याची किमया करुन दाखविली आहे. गोपालगंज जिल्ह्यातील हथुआ येथे राहणार्या रेखा देवी (Rekha Devi Gopalganj Hathua) त्यांचे नाव आहे.
रेखा देवींची मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्या घरात एकट्याच राहत होत्या. याच दरम्यान एका वृत्तपत्रात त्यांनी घरात करण्यात येणार्या शेती प्रयोगासंदर्भात वाचले. आपल्या घरातील काही खोल्या रिकाम्या असल्याने आपणही हा प्रयोग करु शकतो, असा विचार करत त्यांनी घरातच मशरुमची लागवड केली. योग्य पध्दतीने देखभाल केल्यानंतर त्यांना पहिल्याच प्रयत्नात मशरुमचे चांगले उत्पादन मिळाले. त्या मशरुमचा दर्जा चांगला असल्याने बाजारात त्यास चांगली किंमत मिळाली.
तीन लाखांचे उत्पन्न मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. आता घरात केल्या जाणार्या मशरुम शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे रेखा देवी सांगतात. आता त्यांनी मशरुमचे इतर प्रोडक्ट विकायलाही सुरुवात केली. त्या सध्या मशरुमचे लाडू, बिस्किटं आणि लोणचं देखील विकतात. तसेच त्या आजुबाजूच्या लोकांना देखील मशरुम शेतीसंदर्भात टीप्स देतात. घरबसल्या त्यांना यामुळे आता रोजगार मिळाला आहे. तसेच त्यांनी घरामध्ये ओएस्टर, पोर्टबेलो, हेडहॉग, शिटाके आणि बटण या मशरुमच्या इतर प्रकारांची देखील शेती केली आहे.