शेत शिवार । नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवीन कृषी कायदे (Three New Farm Laws) मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर ससंदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी तिन्ही कायदे रद्द केले. मात्र अजूनही दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी मागे हटलेले नाही. यानंतर राकेश टिकेत सारखे शेतकरी नेते सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिशाभुल करत असल्याचा आरोप आता होवू लागला आहे. मात्र याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीने देशातील कोट्यावधी शेतकर्यांची मने जिंकली आहे.
शेतकरी नेत्याची प्रतिमा असलेले माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा (H. D. Deve Gowda) व नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची नुकतीच भेट झाली. या भेटी दरम्यान खुद्द मोदी यांनी हात धरुन देवेगौडा यांना स्वत:हून खुर्ची दिली. पंतप्रधानांच्या या कृतीचे शेतकर्यांनी स्वागत केले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्यासोबतच्या भेटीचे चार फोटो शेअर केले आहेत. संसदेत माजी पंतप्रधानांसोबतची आपली भेट खूप चांगली होती. देवेगौडा यांनी कृषी कायदे मागे घेण्याचे स्वागत केले होते, असे पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून सांगितले. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर देवेगौडा यांनी ट्विट केले होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. या कायद्यांविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्या सर्व शेतकर्यांना माझा सलाम’, असे देवेगौडा म्हणाले होते.
कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनावरून देवेगौडा यांची टीका
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ८ फेब्रुवारी २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेगौडा यांचे कौतुक केले होते. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी कृषी कायद्यांवरील चर्चेला गांभीर्य दिले आहे. देवेगौडा यांनी सरकारच्या चांगल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे आणि सूचनाही दिल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर पी. एम. मोदींनी देवेगौडा यांना शेतकर्यांचे मोठे नेते म्हटले होते. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनावरून देवेगौडा यांनी टीकाही केली होती. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आंदोलकांमध्ये असे काही जण आहेत ज्यांना परिस्थिती चिघळवायची आहे, अशी टीका माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी केली होती.