रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील, चिंचखरी गावात हेमंत यज्ञेश्वर फाटक यांची १२ एकर शेती असून, लहानपणापासून शेतीचे संस्कार रुजल्याने त्यांना शेतीची प्रचंड आवडही होती. रत्नागिरीतील भाट्ये समुद्राच्या खाडीनजीक शेती असल्याने भरतीचे पाणी दरवर्षी शेतात घुसायचे. मग त्यांनी, गावातील लोकांच्या मदतीने मातीचा बांध घातला गेला. पण दरवर्षी पावसाळ्यात नदीच्या पुराचेही पाणी बांध फोडून शेतीत घुसत होते. अशा एक ना अनेक अडचनींना सामना करीत, त्यांनी शेतीतून उत्पन्न काढले आहे.
२०१५ पासून त्यांनी नैसर्गिक शेतीला सुरुवात केली. त्यापूर्वी रासायनिक शेतीत प्रचंड खर्च व्हायचा. शेतीत नफा नावाची गोष्टच शिल्लक राहिली नव्हती. अखेर नैसर्गिक शेतीची प्रशिक्षणे घेत त्यांनी त्यानुसार शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन सुरू केले. काही शेतकऱ्यांचे अनुभवही ऐकले होते. नारळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. वैभव शिंदे, डॉ. संतोष वानखेडे यांच्यासह कृषी अधिकारी विनोद नाळे, विनोद हेगडे यांच्य़ा मार्गदर्शनात त्यांनी कामाला सुरूवात केली. गेल्या पाच वर्षांत उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमा होऊन शेती कौटुंबिक दृष्ट्या स्वयंपूर्ण, शाश्वत होऊ लागल्याचे अनुभव हेमंत सांगतात.
भात रोपवाटिकेसाठी नांगरणी केल्यानंतर बियाण्यावर २४ तास आधी घनजिवामृताची प्रक्रिया केली जाते. देशी दूध, गोमूत्र, शेण, दूध, पाणी आणि हिंग यांचा त्यासाठी वापर होतो. भाताच्या रोपांवर जिवामृताची फवारणी केली जाते. लागवडीवेळी चिखलणी करताना गिरिपुष्प पाल्याचे आच्छादन टाकले जाते. गूळ तसेच काळे तीळ, मटकी, चवळी, हरभरा, उडीद, मूग आदी सात प्रकारची धान्ये एकत्र करून त्यापासून सप्तधान्यांकुर तयार केले जाते. ७०० ग्रॅम मिश्रण प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणे वापरून, पिकांसाठी ते पोषक असल्याचे हेमंत सांगतात. वाटाण्याएवढी कैरी असताना पहिली फवारणी करण्यात येते.
त्यानंतर २१ दिवसांनी व पुन्हा तेवढ्याच दिवसांनी अशी पुढील फवारणी. रोगाला प्रतिबंधक म्हणून दाणे आकाराची कैरी तयार झाली, की गरजेनुसार एक किंवा दोन वेळा देशी दुधापासूनच्या आंबट ताकाची फवारणी आवश्यक असते.
मोहोर फुलल्यापासून ते सेटिंग होईपर्यंतच्या काळात काहीच फवारणी नाही. किडींच्या नियंत्रणासाठी कडुनिंबाचा पाला, निंबोणी पावडर, तिखट मिरचीचा अर्क यांचा वापर ते करतात. नारळ, सुपारीच्या झाडांना पावसाळ्यात पालापाचोळ्यासह झावळ्यांचे तुकडे करून मल्चिंग. त्यावर घनजिवामृत वापरले जाते. पाला चांगल्या प्रकारे कुजल्याने ह्यूमस तयार होते. झाड प्रतिकारक्षम व काटक बनत असल्याचे ते सांगतात. अशा एकूण व्यवस्थापनातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब भरपूर म्हणजे १.३५ टक्के आढळल्याचे हेमंत सांगतात.