मुंबई : देशभरातील खतांच्या ब्रँडमध्ये एकसमानता आणण्यासाठी सरकारने एक आदेश जारी करून सर्व कंपन्यांना त्यांची उत्पादने ‘भारत’ या एकाच ब्रँड नावाने विकण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार, सर्व खतांच्या पिशव्या, मग त्यात युरिया किंवा डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) किंवा म्युरिएट ऑफ ओटाश (एमओपी) किंवा एनपीके या ब्रँडचे नाव ‘भारत युरिया’, ‘भारत डीएपी’, ‘भारत एमओपी’ असे असेल.
खते कंपन्या क्षेत्र-स्तरीय प्रात्यक्षिके, पीक सर्वेक्षण इत्यादीसारख्या अनेक विस्तारित उपक्रम करतात, जेथे त्यांचे ब्रँड ठळकपणे प्रदर्शित केले जातात आणि ते शेतकर्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात. मात्र यामुळे शेतकर्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची दाट शक्यता असते. यामुळे आता केंद्र सरकारने नवा आदेश पारित केला आहे. खत कंपन्यांना १५ सप्टेंबरपासून जुन्या डिझाईन केलेल्या पिशव्या खरेदी करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि २ ऑक्टोबर पासून नवीन प्रणाली लागू होईल. कंपन्यांना त्यांच्या जुन्या डिझाइन केलेल्या पिशव्या संपवण्यासाठी १२ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.