शेत शिवार । नाशिक : यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादन कमी व मागणी जास्त या समीकरणामुळे शेतकर्यांनी कसाबसा वाचविलेल्या कांद्याला यंदा तरी चांगला भाव मिळेल अशी आशा होती. काही दिवसांपूर्वी काही शेतकर्यांना चांगला भाव देखील मिळाला. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतल्याने अफगणिस्तान, इराण, तुर्कीसह अन्य देशांमधून कांदा आयातीला सुरुवात होताच, कांद्याचे दर अचानक कोसळले. लासलगाव बाजार समितीत एका दिवसात लाल कांद्याच्या दरामध्ये ७०० रुपयांची घसरण झाली तसेच उन्हाळी कांद्याच्या दरात ५०० रुपयाची घसरण पाहायला मिळाली. अन्य काही बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या दरामध्ये ८०० तर उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये साडेतीनशे रुपयाची घसरण झाली.
विधानसभा निवडणुका व शहरी ग्राहकांमुळे शेतकर्यांचे नुकसान
कांदा हा प्रत्येक किचन मधील सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक मानला जातो. कांद्याचा वांधा थेट केंद्रातील सरकार पाडू शकतो, याचा अनुभव अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने घेतला आहे. यामुळे देशात कांदा टंचाई किंवा दर वाढ याबाबत सर्वच सरकारे फार जागरुक राहतात. यंदा अतिवृष्टी व पूरामुळे शेतातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकर्यांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवलेला कांदा देखील सडला, त्याची प्रतवारीही घटली. कांद्याचे उत्पादक कमी झाले असल्याने शेतकर्यांच्या हाती असलेल्या कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा होती. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने कांदा टंचाईच्या पार्श्वभूमीवर साठवणूक करणार्या व्यापार्यांवर धाडी, बफरस्टॉकची खरेदी सारख्या उपाययोजना राबविल्या. तसेच कांदा आयातीला परवानगी देऊन कांद्याचे दर स्थिर करण्याचा सरकारचा प्रयत्न केला. यामुळे बाजारात कांदा उपलब्ध झाला असला तरी कांदा उत्पादक शेतकर्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
आगामी काळात पाच राज्यांमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुका व शहरी भागातील ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारने हे पाऊल उचलले असले तरी यात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे कांदा उत्पादक शेतकर्यांचे म्हणणे आहे. गेल्या दोन दिवसात जवळपास ६०० रुपयांनी कांद्याच्या दरात घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. उन्हाळी कांद्याला किमान एक हजार तर जास्तीत जास्त दोन हजार सातशे बारा रुपये तर सरासरी २३०० रुपये भाव मिळत आहे. लाल कांद्याला किमान एक हजार ७०० तर कमाल २२०१ रुपये भाव मिळत आहे. तर सरासरी १७०० रुपये भाव मिळत आहे.