मुंबई : गेल्या पाच ते सहा महिन्यापासून कांदा दरातील चढ उतार सुरु आहेत. त्यातच नाफेडने कांदा खरेदी बंद केल्यापासून तर दरात घसरण सुरु झाली आहे. देशातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगावच्या बाजार समितीमध्ये कांद्याला ११ रुपये किलो असा दर मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. यापार्श्वभूमीवर कांद्याला किमान २५ रुपये दर मिळावा अन्यथा १६ ऑगस्टपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचा पुरवठाच होऊ दिला जाणार नाही असा इशारा कांदा उत्पादक संघटनेने दिला आहे.
यंदा कांदा उत्पादनात वाढ झाली मात्र, गेल्या सहा महिन्यापासून कांदा दरात वाढ झाली नाही. सध्या कांद्याला १ हजार ते १ हजार ५०० रुपये क्विंटल असा दर आहे. शिवाय अधिकच्या दराच्या अपेक्षेने शेतकर्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे. पुरवठा वाढल्यानं शेतकर्यांना योग्य भाव मिळत नाही. सध्याच्या दरामुळे कांदा उत्पादनावर होणारा खर्चही शेतकर्यांना परवडत नाही. शिवाय असेच दर राहिले तर उद्या खरिपातील कांदा मार्केटमध्ये आल्यावर यापेक्षाही दराची स्थिती बिकट होण्याची भीती शेतकर्यांना वाटत आहे.
किमान चार महिन्यानंतर का हाईना कांद्याचे दरात वाढ होणे गरजेचे होते. मात्र, दराच घट ही सुरुच आहे. त्यामुळे कांदा उत्पादक संघटनेने अनोखा निर्णय घेतला आहे. कांद्याला किमान २५ रुपये किलो असा दर मिळावी ही मागणी आहे. १६ ऑगस्टपर्यंत दर वाढले नाहीतर मात्र, बाजारपेठेतच कांदा आणू दिला जाणार नसल्याची आक्रमक भुमिका संघटनेने घेतली आहे. यामुळे १६ तारखेनंतर कांदा सर्वसामान्यांसह सरकारलाही रडवण्याची शक्यता आहे.