नागपूर : अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सर्वाधिक नुकसान विदर्भात झाले आहे. जुलैच्या अंतिम आठवड्यापर्यंत विदर्भात पावसाने थैमान घातले होते. या नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले असून याचा अहवाल लवकरच सरकारला सुपूर्त करण्यात येणार आहे. सलग तीन वर्षांपासून शेतकर्यांचे नुकसान होत आहे. यामुळे यंदा सरकारने शेतकर्यांना मदत करण्यासाठी कोणतीही कंजूषी करु नये, अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे.
दरवर्षी मराठवाडा आणि विदर्भाला मोठ्या पावसाची प्रतिक्षा असते. यंदा मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाने सुरु केलेला धुमाकूळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी झाली की पिके पाण्यात आहेत. पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून आता उत्पादनाच्याही आशा मावळल्या आहेत. विदर्भात १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर नुकासन झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे नागपूर विभागात झाले आहे. नागपूर विभागातील गडचीरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात अतिृष्टीचा मोठा फटका बसलाय. धान, कापूस, तूर, सोयाबीन यासह भाजीपाला आणि फळबागा ह्या पाण्यात आहेत.