औरंगाबाद : मागील काही दिवसापासून राज्यातील बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढत असल्यामुळे दरांमध्ये घसरण सुरु आहे. यामुळे शेतकरी राजा हताश झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या बाजारसमितीमध्ये कांद्याला चक्क रुपया किलो असा दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काय असावी याची कल्पनाच न केलेली बरी.
गेल्या महिन्याभरापासून कांद्याच्या आवकमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी याच बाजार समितीमध्ये 200 ते 900 असा दर होता. मात्र, आवकमध्ये सातत्या राहिल्याने 240 रुपये क्विंटलहून कांदा थेट 100 रुपये क्विंटलवरच येऊन ठेपला आहे. कांद्याच्या दर्जानुसार दर असले तरी सर्वाधिक दर 800 तर सर्वात कमी 100 रुपये क्विंटल ही कांद्याची अवस्था झाली आहे. चार महिने मेहनत, पाणी,औषध फवारणी हे सर्व करुन जर शेतीमालाच्या वाहतूकीचा खर्च त्या मालातून निघत नसेल तर कशी शेती करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे.