कोल्हापूर : कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर गेल्या एक महिन्याच्या कालावधीत दूध भुकटीच्या दराने दोन वर्षांच्या तुलनेत उचांकी गाठली आहे. जगभरातच दूध भुकटीला मागणी वाढल्याने दर तेजीत असल्याचे चित्र दूध उदयोगात पहायला मिळत आहे.
गाईच्या दूध भुकटीस देशांतर्गत बाजारात किलोला सरासरी ३०५ रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही ३०० रुपयांच्या वर दर मिळाला आहे. म्हशीच्या दूध भुकटीस देशांतर्गत बाजारात किलोस ३२५ रुपयेपर्यंत दर आहे. सध्या उन्हाळ्यामुळे पशुपालकाकडून दुधाचा पुरवठा घटला असून, जितके दूध येईल, तितक्या दुधाची विक्री होत आहे. त्यामुळे दूध भुकटी करण्याचे प्रमाण प्रचंड कमी झाले आहे. अनेक नामवंत दूध संघांमध्ये दूध भुकटी करण्याऐवजी आलेले दूध थेट विकण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे दुध भुकटीचा माल झपाट्याने संपत आहे. यामुळे बाजारांमध्ये दूध भुकटीची टंचाई जाणवत आहे.
कोरोनाच्या लाटेमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये दूध पावडरचे दर खाली वर होत आहेत. बाजारपेठा बंद असल्याने दूध पावडरीचा विक्रीवर मर्यादा आली. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत गाय दूध भुकटीचे दर किलोस १८० रुपयापर्यंत खाली घसरले. पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येण्यापूर्वी थोड्या प्रमाणात बाजारपेठा खुल्या झाल्या. यामुळे २५० रुपयांपर्यंत दर वधारले.
पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दरात घसरण झाली होती.
दोन महिन्यांपूर्वी मात्र देशातून कोरोनाची लाट पूर्णपणे थांबल्याने, बाजारपेठा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. रोगाचे सावट नसल्याने सर्व उद्योगधंदे पूर्ववत सुरू झाले आहे. दुधासह दूध भुकटीला ही मागणी वाढली आहे. त्यातच उन्हाळा आल्याने दुधाचे उत्पादन घटले. यामुळे अतिरिक्त दुधापासून भुकटी तयार करण्याचे काम ही मंदावले आहे. याचा परिणाम दूध भुकटीचे दर वाढण्यावर झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही दूध भुकटीची मागणी वाढल्याने, देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध भुकटीला चांगले दर मिळत असल्याची सध्याची स्थिती आहे.
मेपर्यंत वाढणार दर
सध्याची मागणी व अपुरा दूधपुरवठा या पार्श्वभूमीवर दूध भुकटी दरात मे महिन्यापर्यंत तरी तेजी कायम राहू शकतात. मेनंतर न्यूझीलंड व अन्य दुग्धोत्पादनात आघाडीवर असणाऱ्या देशांत दुधाचे उत्पादन वाढेल. यानंतरच दूध भुकटीचे दर काहीसे कमी होतील, अशी शक्यता दूध उद्योगातून व्यक्त करण्यात आली.