पुणे : बटाटे कुठे उगवतात? या प्रश्नाचे साधे आणि सरळ उत्तर म्हणजे जमीनीत किंवा फारफार तर जमीनीवर. मात्र हवेत बटाट्याचे उत्पादन घेता येऊ शकते, असे कुणी म्हटल्यास कुणीच विश्वास ठेवणार नाही. मात्र हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात एरोनोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चक्क हवेत बटाट्याचे उत्पादन घेवून दाखविण्याचा चमत्कार एका शेतकर्याने करुन दाखविला आहे. या तंत्रज्ञानाव्दारे बटाट्याचे उत्पादन १० पटीने वाढल्याचा दावाही करण्यात आला आहे.
एरोपोनिक हे नवीन तंत्रज्ञान शेतीत आल्याने हवेतील शेतीचा प्रयोग शक्य झाला आहे. वास्तविक या पद्धतीत माती आणि हवेत जमीन न ठेवता शेती करता येते. एरोपोनिक तंत्रज्ञानाचा शोध हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात असलेल्या बटाटा तंत्रज्ञान केंद्राने लावला आहे. तज्ज्ञांच्या मते, या तंत्राने लागवड केल्यास बटाट्याचे उत्पादन १० पटीने वाढते. या तंत्राने शेती करण्यासाठी शेतकर्यांना सरकारने मान्यताही दिली आहे.
अशी केली जाते एरोपोनिक शेती
एरोपोनिक तंत्रात, बटाट्यांचे पोषण मुळांना लटकवून केले जाते. त्यानंतर त्यात माती आणि जमिनीची गरज नाही. एरोपोनिक तंत्रज्ञानाने केलेली शेती शेतकर्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकर्यांना कमी खर्चात व कमी जागेत बटाट्याचे अधिक उत्पादन घेता येईल. याचा वापर पालेभाज्या, स्ट्रॉबेरी, काकडी, टोमॅटो आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनासाठी केला जात आहे.