पंढरपूर : गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहर व तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. हा पाऊस शेती मशागत केलेल्या क्षेत्रासाठी पोषक आहे तर उभ्या असलेल्या फळबागांचे मात्र, नुकसान हे ठरलेलेच आहे. शुक्रवारी तर पहाटेपासूनच पावसाला सुरवात झाल्याने केळी बागांचे मोठे नुकसान होत आहे. वादळी वार्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडत आहेत. तर द्राक्षांच्या घडाचेही नुकसान होत आहे.
तालुक्यातील पटवर्धन कुरोलि येथील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे तर कासेगाव, टाकळी या भागत द्राक्ष पिकाचे कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी यंदाचा हंगाम केवळ नुकसानीचाच होता. आता अंतिम टप्प्यात का होईना उत्पादन पदरी पडेल असा आशावाद होता पण आता अवकाळी नव्हे तर मान्सूनपूर्व पावसाने धडाका सुरु केला आहे.
द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकर्यांनी काढणी करुन त्वरीत त्याची विक्री करावी. दुसरीकडे उन्हाळी हंगामातील पिकेही शेतामध्ये उभी असून काही ठिकाणी काढणी कामे सुरु झाली आहेत. भुईमूग, उन्हाळी सोयाबीन याची काढणी झाली की लागलीच सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी किंवा मळणी करुन विक्री असे पर्याय शेतकर्यांसमोर आहेत.