सोलापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या सौद्याला सुरुवात करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी निंबर्गीतील शेतकरी कल्याणी शिरगोंडे यांच्या बेदाण्याला प्रतिकिलो ३११ रुपये असा विक्रमी भाव मिळाला आहे.
बाजार समितीचे सभापती, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते बेदाणा विक्रीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, उपसभापती श्रीशैल नरोळे, संचालक बसवराज ईटकळे यांच्यासह संचालक व व्यापारी उपस्थित होते. बाजार समितीत सांगली, तासगाव, नाशिक, पंढरपूरचे व्यापारी येत असल्याने बेदाण्यांच्या लिलावाला प्रतिसाद वाढल्याबद्दल सभापती देशमुख यांनी समाधान व्यक्त केले.
पहिल्या दिवशी दक्षिण सोलापूर, कर्नाटकातून पाच व्यापाऱ्यांकडे ७५ हजार ८४० बॉक्स बेदाणे (७५ टन) आवक झाली. यांतील ४० हजार ८९० बॉक्स विकले गेले. ४० रुपयांपासून ३११ रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सरासरी सर्वसाधारण १९१ रुपये किलोने बेदाणा विकाला गेला. यातून ७८ लाख ९ हजार ९९० रुपयांची उलाढाल झाली.
पहिलाच लॉटला समाधान
निंबर्गीचे शेतकरी कल्याणी शिरगोंडे यांच्याकडे १४ एकर द्राक्षबाग आहे. आजोबांपासून ते शेती करतात. स्वतः संगणक अभियंता असताना गेल्या आठ वर्षापासून ते द्राक्षशेती सांभाळत आहेत. यंदा ऑक्टोबर छाटणीनंतर भरपूर पाऊस झाला. याही स्थितीत त्यांनी द्राक्षाचे पीक उत्तम आणले आहे. १५ दिवसांपूर्वी बेदाणा तयार करण्यास सुरुवात केली. पहिल्या लॉटमधील ५१ बॉक्स (७५० किलो) विक्रीस आणले. आणखी ४० टन बेदाणा उत्पादनाची त्यांची अपेक्षा आहे.
गतवर्षी ३४ कोटींची उलाढाल
बाजार समितीत गतवर्षी ४ मार्चला सौदे सुरू झाले. ९ डिसेंबरपर्यंत १७ सौदे झाले. यात २ लाख ७९ हजार ७३ बॉक्स बेदाणा विक्रीला आला. त्यांपैकी १ लाख ४० हजार ६९२ बॉक्स विकले गेले. यातून ३४ कोटी १३ लाख ७४ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली. भाव ४० ते १६० रुपये राहिला. जास्तीत जास्त २६५ रुपये किलो भाव मिळाला.
हे देखील वाचा :