नागपूर : करडी ही महाराष्ट्रातील घेतल्या जाणार्या तेलबियांच्या पिकांपैकी एक महत्त्वाचे कोरडवाहू पीक आहे. महाराष्ट्रातील तेलबियाखालील क्षेत्राचा विचार केला असता करडीचा दुसरा क्रमांक लागतो. करडीच्या बियाण्यामध्ये २८ ते ३०% पर्यंत तेलाचे प्रमाण राहते व करडी हे पीक १३० ते १३५ दिवसांमध्ये तयार होते. या पिकासाठी काळी, मध्यम व खोल, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन योग्य असते.
करडीची पेरणी १५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर या कालावधीत करावी. जमिनीत ओल असल्यास किंवा पाऊस झाल्यास ७ नोव्हेंबरपर्यंत करडीची पेरणी करा. पेरणीसोबत खताची मात्रा दिल्यास उत्पादनात १५% वाढ होते. उगवणीनंतर १५ ते २० दिवसांच्या आत २० सें मी. च्या अंतराने विरळणी करावी. त्यामुळे उत्पादनात १५% वाढ होते. उगवणीनंतर १५ दिवसांच्या आत एक निंदणी आणि डवरणी / कोळपणी करा; तसेच पेरणीनंतर ३, ५ व ७ व्या आठवड्याला डवरणी / कोळपणी केल्यास २५% उत्पादनात वाढ होते. मावा कीड आणि मर रोग आल्यास ताबडतोब पीक संरक्षण उपाय करा. त्यामुळे उत्पादनात २१% वाढ होते.
या पिकासाठी रासायनिक खतांचा वापर योग्य पध्दतीने करावा. २५ किलो नत्र व २५ मिलो स्फूरद (युरिया ५० कि.+क् सिंगल सुपर फॉस्फेट १५० किलो प्रति हेक्टरी) ही खते २ इंच बियांच्या खाली पेरणीबरोबर द्यावी. कारण पेरणीच्या वेळी ओलावा भरपूर असल्याने दिलेल्या खतांचे शोषण होते व त्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ होते किंवा १:१ प्रमाण असलेली संयुक्त रासायनिक खते करडी पिकास देणे योग्य असते. गंधकयुक्त खताचा विचार केल्यास सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये स्फुरद १६%, गंधक १२% व कॅलशियम २१% असते. वरीलप्रमाणे खताची मात्रा दिल्यास १५% करडी पिकाचे उत्पादन वाढते.
करडीवर किडीचा फारसा परिणाम होत नाही. मावा ही करडीवर येणारी कीड योग्य काळात पेरणी केल्यास दूर राखता येते. माव्याचा प्रादुर्भाव झाल्यास एंडोसल्फान किंवा डायमिथोएट यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी केल्यास सहज नियंत्रित होते. इतर पिकाच्या तुलनेत करडीला प्रतिबंधक उपाय कमी लागतात. म्हणूनच खर्चसुद्धा प्रति एकरी कमी होतो. करडी पिकास पाणी देताना खूप काळजी घ्यावी. कारण या पिकाला मोकळे पाणी मुळीच चालत नाही. पाणी देण्यासाठी सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा किंवा स्प्रिंकलरने पाणी द्यावे. शेवटची डवरणी किंवा कोळपणी करताना औताला दोरी बांधून घ्यावी व ओढणी करावी. त्यामुळे सरी पडतात. त्या सरीला एकाआड एक सरी सोडून पाणी द्यावे; परंतु कुठल्याही परिस्थितीत मोकळे पाणी देवू नये. तसेच पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.