यवतमाळ : शेतातील कामे करताना नीलगाय, रोही, अस्वल, रानडुक्कर, हरणांकडून हल्ले होत असतात. या वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेतातील पिकांची नासाडी होत असते. पारंपरिक पद्धतीने आपण वन्य प्राण्यांपासून पिकांचे व शेतीचे संरक्षण निश्चितच करू शकतो.
अलिकडच्या काळात बेसुमार जंगलतोडीमुळे जंगलांचं क्षेत्र कमी होत असल्यामुळे त्यात वास्तव्य करणार्या प्राण्यांवर सुरक्षित जागेचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तो घेताना हे वन्यप्राणी अनेकवेळा मानवी वस्तीत आणि शेतात शिरतात. त्यामुळे मानवी जिविताला धोका निर्माण होतो, तसंच शेतांचंही प्रचंड नुकसान होतं. उदाहरण द्यायचं तर कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या हत्तींमुळे आपल्याकडील शेतीचं नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडल्या. कोल्ह्यांनी तसंच रान डुकरांनी शेतीचं नुकसान केल्याचंही दिसतं.
रानडुकरांपासून शेताचं संरक्षण करण्यासाठी डब्यांचा, फटाक्यांचा किंवा बंदुकीचा आवाज करणं असे उपाय शेतकर्यांकडून योजले जातात. पारंपरिक किंवा आधुनिक पद्धतीने शेतीला कुंपण बांधणं, शेतीभोवती चर खोदणं असेही संरक्षणात्मक उपाय शेतकर्यांनी केले आहेत. तर हे उपाय खर्चिक वाटणार्यांनी वन्यप्राणी खाणार नाहीत अशी पिकं घेऊन शतीचं संरक्षण केलं आहे. शासनातर्फे शेती संरक्षणासाठी बंदूक परवाने दिले जातात. परंतु सर्वच शेतकर्यांना बंदुका विकत घेणं आणि त्यांचा उपयोग करणं परवडण्यासारखं नाही.
दुष्काळामुळे नुकसान होणार्या पिकांचा विमा उतरवण्याची पद्धत आहे, त्याचप्रमाणे वन्यप्राण्यांपासून होणार्या पिकांच्या नुकसानीबाबत भरपाईची तरतूद आहे. त्यानुसार रानडुक्कर, हरीण, रानगवा आणि हत्ती या वन्यप्राण्यांपासून भरपाई दिली जाते. पोपट, वटवाघूळ या सारख्या पक्ष्यांकडूनही शेतीचं काही प्रमाणात नुकसान होतं. दिवसा शेतीचं नुकसान करणार्या पक्ष्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी उपाययोजना करत असले तरी वटवाघुळासारख्या पक्ष्यांमुळे रात्री पिकांचं होणारं नुकसान कसं टाळायचं हा प्रश्न कायम त्रासदायक ठरतो.
शेती संरक्षणासाठी काही पारंपारीक उपाय
गावठी डुकरांची विष्ठा पसरविणे- यामध्ये स्थानिक रानडुकरांपासून गोळा केलेल्या विष्ठेचे द्रावण तयार करून मातीवर शिंपडले जाते. ज्याचे अंतर पिकांपासून एक फूट एवढे असते. त्यामुळे रानडुकरांमध्ये आपण इतर डुकरांच्या सीमेत प्रवेश केला आहे, याचा भास होतो. त्यामुळे ते प्रादेशिकवाद टाळण्यासाठी तेथून काढता पाय घेतात.
मानवी केसांचा श्वास रोधक म्हणून वापर- स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो. ही पद्धत अत्यंत कमी खर्चाची आहे. शेतात हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरविल्याने अन्नाच्या शोधात येणाऱ्या रानडुकरांच्या श्वसन नलिकेत हे केस अडकतात आणि ते सैरावैरा धावायला लागतात. अनेक शेतकरी हा प्रयोग करत आहेत.
रंगीत साड्या पिकांभोवती बांधणे- या पद्धतीत विविध रंगांच्या साड्या पिकांच्या भोवती रोवल्या जातात. त्यामुळे रानडुकरांना शेतात कुणीतरी मानव असल्याचा भास होतो. त्यामुळे ते शेतात प्रवेश करू शकत नाही. वाळलेल्या शेणाच्या गौऱ्या जाळणे- स्थानिक डुकरांपासून किंवा त्यांच्या विष्ठेपासून तयार केलेल्या गौऱ्या मातीच्या भांड्यात जाळून व त्याचा धूर करून सुद्धा आपण रानडुकरांना पळवू शकतो. या पद्धतीत धूर हळूहळू पसरून रानडुकरांना पळविले जाते.
या पद्धतीचा वापर मुख्यतः सायंकाळी केला जातो. आवाज निर्मिती- फटाक्यांचा वापर, स्थानिक ड्रम, रिकामे कॅन पत्राचे भांडे, जाळ करणे आणि जोरजोरात ओरडणे या पद्धतींचा वापर करतात. श्वानांचा वापर- काही वेळेस शेतकरी पिकांचे वन्य प्राणी आणि रानडुकरांपासून रक्षण करण्यासाठी पारंपरिक स्थानिक कुत्रे पाळतात. ज्यांच्या मदतीने या रानडुकरांना पळविले जाते व पिकांचे नुकसान टाळले जाते.
हे देखील वाचा: