पुणे : गत काही दिवसांपासून राज्यात कधी कडक उन्हाळा तर कधी अवकाळी पाऊस अशी परिस्थिती आहे. निसर्गाच्या या खेळात केवळ आंबा पिकच नाही तर केळी, फूलशेती आणि रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. आंब्याचा मोहर काळवंडत आहे त्याच प्रमाणे ज्वारीची कणसे आणि गव्हाच्या लोंब्या देखील काळवंडत आहे. केळी व पपई या फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बंगालच्या उपसागरात आसानी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. त्याचाच परिणाम आता महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. त्यामुळेच कोकणातील रत्नागिरी, गुहागर, चिपळूण, खेड दापोली या परिसरात ढगाळ वातावरण असल्याने आंब्यावरील मोहोळ काळवंडला असून आंब्याच्या पीक यावर्षी फुकट जाण्याची भीती शेतकर्यांमधून व्यक्त केली जाते. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा आंबा उत्पादकांवर झालेला आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी कामे सुरु असतानाच या वातावरणामुळे शेतकर्यांची चिंता वाढलेली आहे. ज्वारी पीक काढून शेतातच आहे तर दुसरीकडे गहू, हरभरा, उन्हाळी सोयाबीन हे शेतात उभे आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांच्या मुळावर उठला आहे. सध्या राज्यभरात निर्माण झालेल्या वातावरणामुळे शेतकरी प्रचंड धास्तावलेला दिसत आहे.