जळगाव : गत २० दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने दोन दिवसांपासून थोडीशी उघडदीप दिल्याने शेती कामांना वेग आला आहे. मात्र शेतकर्यांपुढे नवीनच संकट उभे राहिले आहे. सततच्या पावसामुळे पिकं पिवळी पडायला लागली आहेत. अनेक पिकांवर रोगराईचे संकट आले आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीया या खताची सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांना गरज असते. परंतु अनेक कृषी केंद्रात युरीया खत उपलब्ध नाही. खताचा तुटवडा असल्याने शेतकर्यांना चिंता सतावत आहे.
पावसाने उघडदीप दिल्याने शेतकर्यांची डवरणी व फवारणीची कामे आटोपली आहे. आता पिकांची जोमदार वाढ असते. पिके परिपक्व होण्याच्या मार्गावर असल्याने या पिकांना योग्य वाढीसाठी युरिया खताची नितांत गरज असते. परंतू सध्या युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकर्यांची पंचाईत होत आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकर्यांची कसरत सुरू आहे. पिकांना देण्याकरिता युरियाच बाजाराच उपलब्ध नसल्याने शेतकर्यांनी कोणती खते पिकांना द्यावी, असा प्रश्न शेतकर्यांतून उपस्थित होत आहे.
युरियाचा काळाबाजार
अनेक ठिकाणी युरिया घेण्यासाठी शेतकर्यांना युरिया सोबत इतर खतं घेण्याची सक्ती देखील केली जाते. यंदाही तशीच काहीशी परिस्थीती आहे. जर फक्त युरियाच घ्यायचा असेल तर मात्र, शेतकर्यांना मुळ किंमती पेक्षा दोन पैसे जास्त द्यावे लागत आहे. एकंदरीत महाराष्ट्रात युरियाचा काळा बाजारही सुरु झाला आहे. कृषी विभाग युरियाचा काळाबाजार नसल्याचा दावा करत असला तरी बाजारपेठेत शेतकर्यांची आर्थिक लूट होत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे व शेतकर्यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी होत आहे.