पुणे : हवामान खात्याचे सर्व अंदाज चुकवत पावसाचे आगमन दिवसेंदिवस लांबतच चालले आहे. पाऊस लांबल्याने उत्पादनात घट होणे, बाजारपेठेचे गणित बदलले असे परिणाम सर्वांनाच माहित आहे. मात्र याचा पीक कर्जाशी मोठा संबंध असतो, हे तुम्हाला माहित आहे का? (Crop Loan Scheme)
पीक कर्जाचे वाटप हा प्रत्येक हंगामात चर्चेचा विषय असतो. खरीप आणि रब्बी हंगामात शेतकर्यांची अडचण होऊ नये म्हणून पीक कर्जाचे वाटप केले जाते. यावरील व्याजात तर सूट असतेच पण शेतकर्यांना ऐन गरजेच्या वेळी ही रक्कम कामी येते. यामुळे दरवर्षी शेतकरी पीक कर्जासाठी धावपळ करतांना दिसतात. मात्र शासनाने वारंवार आदेश/सुचना देवूनही बहुतांश बँका पीक कर्ज वाटपासाठी फारशा उत्सूक नसतात. पीक कर्जासाठी शेतकरी बँकाच्या हेलपाटे मारतात मात्र चप्पला झिजवण्या पलीकडे त्यांच्या हाती काहीच येत नाही.
यंदाचे चित्र मात्र पूर्णपणे वेगळे दिसून येत आहे. पुरेशा पावसाअभावी खरिपातील पेरण्यांना पूर्ण क्षमतेने सुरवात झालेली नाही, शिवाय जी धूळपेरणी करण्यात आलेली आहे त्याचीही उगवण झालेली नाही. अशा प्रतिकूल परस्थितीमध्ये कर्जाचा डोंगर कशाला? या धारणेने शेतकरी पीक कर्जाकडे स्वत:हून पाठ फिरवत आहेत. विनाकारण कर्ज काढू ते अदा करायचे कसे असा सवाल आहे. तर दुसरीकडे नव्याने कर्जाचे प्रकरण करायचे म्हणल्यावर थकबाकी अदा करावी लागते. पण शेतकरी कर्जासाठीच इच्छूक नसल्यामुळे थकबाकी अदा करण्याचा प्रश्नच नाही. थकीत कर्ज भरुन नवीन प्रकरण करणे ही प्रक्रिया मंदावली आहे.