सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरिप हंगामात हाती काहीच येणार नाही, अशी अनेक ठिकाणी परिस्थिती दिसून येत आहे. या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई म्हणून एकरी ५० हजार रुपये देण्यात यावे, असा ठराव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यात करण्यात आला.
या मेळाव्याचे उद्घाटन रिपाइंचे राष्ट्रीय खजिनदार रामराव दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे होते. प्रारंभी प्रास्ताविक पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी केले. याप्रसंगी डॉ. सारीपुत्र तिपुरे, डॉ. राजकुमार सोनवले, संजय गाडे, चंद्रकांत कांबळे, जलील भाई, इ. जा. तांबोळी, प्रा. सुहास उघडे, फारूक शेख, रियाज सय्यद आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या मेळाव्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना एकरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा ठराव करण्यात आला. यासह रमाई आवास योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी, रेशन धान्य दुकानदारांमार्फत ग्राहकांना धान्य न देणार्या या दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, मागासवर्गीय वित्तीय महामंडळामार्फत कर्ज योजनेचा लाभ हा त्या घटकांना मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांनी लीड बँकेला सक्ती करावी, संजय निराधार लाभार्थ्यांना दर महिन्याला रक्कम मिळावी आदी ठराव देखील करण्यात आले.