मुंबई : सोयाबीनसह इतर आठ शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सोयाबीन, सोयातेल, सोयापेंड, सोयाडेस्क कच्चे पामतेल, मूग, गहू, बासमती वगळून इतर भात, मोहरी, मोहरी तेल आणि हरभरा या शेतीमालाचा आता वायदा होणार नाही. यामधील हरभरा, मोहरी आणि मोहरी तेल या शेतीमालावर यापूर्वीच वायदेबंदी घालण्यात आली आहे. यामधील गव्हाचे फारसे व्यवहार हे थेट शेतकर्यांशी संबंधित नसतात मात्र, सोयाबीन, मूग, हरभरा, मोहरीच्या दरावर होणारा परिणाम थेट शेतकर्यांशी संबंधित असणार आहे.
वायदे बंद म्हणजे काय?
शेतीमालाच्या विक्री ही वायद्यानुसार म्हणजेच दर ठरविले जात होते पण पैसे अदा करण्यासाठी व्यापारी, आडते यांना मोकळीक होती. त्यासाठी आवधी मिळत होता अन् शेतकऱ्यांना चांगला दरही. त्यामुळे साठा करणारे व्यापारी आणि प्रक्रिया उद्योदक हे मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करीत होते. पण आता यावरच बंदी असल्याने त्याचा थेट परिणाम शेतकर्यांच्या अर्थार्जानावर होणार आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना असे करा नियोजन
गत १५ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी चढ-उतार दिसून येते. सुरुवातीला विक्रमी दर गाठल्यानंतरही सोयाबीची आवक मंदावली होती. त्यानंतर सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली. भविष्यात दर वाढतील या अपेक्षेने शेतकर्यांनी सोयाबीनची साठवणूक केली होती. मात्र त्यानंतरही दरांमध्ये मोठा फरक पडला नाही. आता सोयाबीनच्या वायदे बाजारांवर बंदी घातल्यानंतर नजिकच्या काळात सोयाबीनची मोठी आवक अपेक्षित आहे. जर बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली तर त्याचा विपरित परिणाम दरांवर देखील येवू शकतो. यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्रीच फायद्याची राहणार आहे.