पुणे : अलीकडच्या दोन-तिन वर्षात काही प्रगतीशिल शेतकऱ्यांनी रेशीमचे उत्पादन (Silk Farming) घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. कमी पाण्यात अधिकचे उत्पादन यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. यासाठी शासनातर्फे शेतकर्यांना अनुदान देखील देण्यात येते. मात्र रेशीम शेतीला शासनाकडून मिळणार्या मदतीबाबत पुरेशी माहिती नसल्याने अनेक तरुण शेतकऱ्यांना इच्छा असूनही याकडे वळता येत नाही. यंदाच्या वर्षात कोषाचे दरही वाढलेले आहेत. या कोषाचे प्रतिकिलोचे दर हे ६५० रुपयांवर येऊन ठेपले आहेत. यामुळे येणार्या काळात रेशीम शेतीकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळतील, असा अंदाज आहे. यामुळे रेशीम शेतीसाठी अनुदान किती आहे? त्यासाठी कसा व कुठे अर्ज करावा? याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
अनुदान किती आहे?
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी या योजने अंतर्गत १ एकरसाठी तुती लागवड (Mulberry planting) जोपासना तसेच साहित्य खरेदी यामध्ये रोपे, खते, औषधी यासाठी एकूण २ लाख १७६ रुपये इतके अनुदान ३ वर्षात विभागून दिले जाते. तसेच किटक संगोपन गृह बांधकामासाठी एका वर्षात ९२ हजार २८९ रुपये अनुदान देण्यात येते. या योजनेत लाभ घेण्यासाठी मात्र, लाभार्थी यांचेकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे. तर केंद्रच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या सिल्क समग्र ही योजना ज्यांच्यासाठीच आहे जे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सहभाग घेऊ शकले नाहीत. सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी जॅाबकार्ड असेल तर एकूण खर्चाच्या ७५ टक्के अनुदान हे तीन वर्षात मिळते. तर अनुसूचित जाती-जमातीमधील लाभार्थ्यांसाठी ९० टक्के अनुदान ३ वर्षात मिळते. किमान १ एक्करमध्ये तुतीची लागवड ही बंधनकारक राहणार आहे.
अनुदानासाठी असा करा अर्ज
सर्व प्रथम रेशीम संचालनालयाची (Directorate of Silk) www.mahasilk.maharashtra.gov.in या वेबसाईट वर साईन अप मध्ये New user वर क्लिक करून I Agree केल्यानंतर Stake Holder मध्ये – Farmer – Mulberry/Tasar वर क्लीक करावे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो, आधार कार्ड व बँक पास बुक ची फोटो कॉपी Upload करावी. शेवटी Submit केल्यानंतर शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्याचे कॉम्पुटर च्या screen वर sms येईल. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास जाऊन 7/12, 8 अ, बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड हे नोंदणी शुल्कासह देऊन नोंदणी पूर्ण करावी.
अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, ८ अ, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॅाक्स, आधार कार्डची झेरॅाक्स, मतदान ओळखपत्र, मनरेगाच्या जॅाबकार्डची झेरॅाक्स आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो हे रेशीम उद्योग कार्यालयात जमा करावे लागणार आहेत.