मातीशिवायच गच्चीवर शेती; महिलेचा अभिनव प्रयोग

- Advertisement -

नागपूर : हिवराई विदर्भाची संकल्पनेतून, मनीषनगर येथील अंजली मदन गाडके यांनी गच्चीवर मातीविरहीत शेतीचा यशस्वी प्रयोग साकारला आहे. स्वयंपाकघरातील काचऱ्यामधल्या विघटनशील पदार्थांपासून कंपोस्ट खत तयार करण्याचे तंत्र त्यांनी त्यासाठी वापरले. पुण्यातील तांबे कुटुंबाचा आदर्श घेत, नागपुरात १८ जानेवारी २०१८ पासून गच्चीवरील मातीविरहित बाग हा नवा ग्रूप सुरू करून कामाला सुरुवात केली. आजमितीस या ग्रूपमध्ये साडेतीनशेहून अधिक सदस्य आहेत आणि किमान १०० जणांच्या घरी फुललेली अशी मातीविरहित बाग गच्चीवर किंवा गॅलरीत आपल्याला पहावयास मिळू शकते.

आपण बाजारातून रोपटे आणून कुंडीत माती भरून लावतो. तसे न करता, आणलेल्या रोपट्याच्या मुळांना लपेटण्यासाठी जेवढी माती लावली असेल तेवढीच कायम ठेवून बाकी घरात तयार केलेल्या कंपोस्ट खताने कुंडी भरून काढायची. हे खत कालांतराने खाली बसत जाते. वर रिकामी झालेली जागा पुन्हा खत टाकूनच भरून काढायची. या रोपट्याला पाणी एरव्ही देतो तसेच द्यायचे. फक्त ते थोडेसेच न देता, कुंडीच्या खालून ते बाहेर निघत आहे याची खात्री होईपर्यंत द्यायचे. याचे कारण असे की, पाणी जर साचून राहिले तर मुळं सडून रोपटे नष्ट होईल.

गच्चीवर शेती करायची असल्यास मोठ्या प्रमाणात माती लागते. पण कुंड्यात भरण्यासाठी अशी माती आणणे ही खूप कष्टाचे व खर्चीक असते. शिवाय अशा मातीचा वापर करून भरलेल्या कुंडया जड होतात. त्याउलट माझ्या पद्धतीने म्हणजेच मातीचा अजिबात वापर न करता वरील नैसर्गिक स्त्रोतांचा कुंडी वाफा भरण्यासाठी वापर केल्यास त्यातून घरातील टाकाऊ ओल्या कचऱ्याचे अगदी सहजपणे व्यवस्थापन होते. अशा पध्दतीने फुलवलेला बाग-बगीचा हा अधिक तजेलदार, हिरवागार, टवटवीत तर असतोच पण त्यातून उत्पन्न होणारी फळे, फुले, भाजीपाला हा पूर्णपणे विषमुक्त व रासायनिक शेतीतील उत्पन्नापेक्षा अधिक चवदार व सत्वयुक्त असतो. अशी गच्चीरील माती विरहित बागेची संकल्पना असून सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक अभिसरण घडवून आणणारी ही संकल्पना सर्वदूर पसरावी यासाठी प्रयत्न वाढवणे नितांत गरजेचे असल्याचे अंजली गाडगे यांनी सांगीतले.

कंपोस्ट खत कसे तयार कराल?

चिरलेल्या पालेभाज्यांचे देठ, भाज्यांची व फळांची साले, कागदाचे तुकडे, खोबरं काढून झाल्यानंतर उरलेल्या नारळाचे सर्व भाग असे सर्व प्रकारचे विघटनशील पदार्थ छिद्र केलेल्या माठात किंवा पिंपात टाकत रहायचे. त्यावर झाकण ठेवायचे. या माठाला खाली व बाजूला छिद्रे करावीत. त्यामुळे कचºयातील पाणी निघून जाईल व कचरा कोरडा राहील. त्याचे कंपोस्ट खत होण्यासाठी सुरुवातीला बायोकल्चरचा वापर करणे आवश्यक ठरते. बायोकल्चर म्हणजे एक प्रकारचे विरजण असते. त्यामुळे खत निर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू होते. एकदा खत तयार झाले की तेच बायोकल्चरचे काम करते.

साधारण दर आठ दिवसांनी माठात ठेवलेला हा कचरा वर खाली करायचा. पूर्णपणे कंपोस्ट खत तयार व्हायला अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. उन्हाळ्यात ही प्रक्रिया जरा लवकर होते तर हिवाळा-पावसाळ्यात थोडा अधिक अवधी लागतो. कचरा साठवायचा म्हटला की दुर्गंधी, डास, चिलटे, मुंग्या असे प्रश्न उभे होऊ शकतात. पण हा माठ घराच्या बाहेर गच्चीत वा गॅलरीत ठेवल्यास त्याचा त्रास होत नाही. मुख्य म्हणजे त्यातील पाण्याचा अंश निघून गेल्याने तो पूर्णपणे कोरडा होतो व त्याला अजिबात दुर्गंधी येत नाही. चहाच्या पावडरप्रमाणे हे कंपोस्ट खत दिसू लागते.

माती विरहित बाग म्हणजे काय?

गच्चीवरील माती विरहित बाग या संकल्पनेत आपल्या गच्चीवर,बाल्कनीत किंवा घर/बंगल्याच्या आवारात बाग-बगीच्या फुलवतांना आपल्या घरातच अगदी सहजपणे उपलब्ध होणाऱ्या (माती शिवाय) खाली दिलेल्या वस्तूंचा व नैसर्गिक स्त्रोतांचा सुयोग्य व प्रमाणशिर वापर करावा हे अभिप्रेत आहे. आपणांस अगदी विनासायास सहजपणे उपलब्ध असणारे नैसर्गिक स्त्रोत, म्हणजेच झाडांची पाने, वाळलेला पालापाचोळा,फुलांचे निर्माल्य, स्वयंपाकघरातील दररोज वापरात येणारा हिरव्या व ओल्या भाजीपाल्याचा टाकाऊ (त्याज्य) भाग,फळांचा साली,नारळाच्या शेंड्या व करवंटयांचे तुकडे,रसवंतीगृहातून मिळणारी ऊसाची चिपाडे, भाताचे तुस,विटांचे बारीक बारीक तुकडे,खडी व जाड वाळू हा होय.

हे देखील वाचा