यवतमाळ : यवतमाळमध्ये सिंजेंटा कंपनीच्या पोलो नावाच्या कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेकडो शेतकर्यांना विषबाधा झाली होती, त्यापैकी २३ शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. याविरोधात यवतमाळच्या तीन शेतकर्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या कंपनीला स्वित्झर्लंडमध्ये न्यायालयात खेचण्यात आले आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीला शेतकर्यांनी त्यांच्या देशात जावून न्यायालयात खेचण्याची ही देशातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे. तीन शेतकर्यांच्या धाडस व प्रयत्नांमुळे आता मयत शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे.
२०१७ मध्ये यवतमाळमधील शेकडो शेतकरी कपाशीच्या शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधेचे बळी ठरले होते. यामध्ये २३ शेतकर्यांचा मृत्यू झाला होता. विषबाधेमुळे झालेल्या मृत्यू आणि अपंगत्वासाठी शेतकरी आणि दोघांच्या पत्नीने बहुराष्ट्रीय कंपनीला जबाबदार धरत खटला दाखल केला होता. २०२१ मध्ये, शेतकर्यांनी स्वित्झर्लंडमधील बासेल येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. ज्यामध्ये शेतात कीटकनाशक फवारणीदरम्यान विषबाधेमुळे शेतकर्यांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
पेस्टिसाइड अॅक्शन नेटवर्क (पॅन) नावाच्या एनजीओने स्विस कंपनी सिंजेंटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित शेतकर्यांना मदत केली. सिंजेंटा कंपनीचे पोलो कीटकनाशक शेतकर्यांच्या मृत्यूला आणि जिवंत शेतकर्यांच्या आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत असल्याचा दावा या प्रकरणातील वकीलांनी केला होता. जेव्हा कंपनीने आरोप नाकारले, तेव्हा एनजीओने पोलिस रेकॉर्डमध्ये सिंजेंटा कीटकनाशकाच्या विषबाधाच्या ९६ प्रकरणांची कागदपत्रे सादर केली. याचिकाकर्त्यांनी जून २०२१ मध्ये बासेल येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला. स्वित्झर्लंडमध्ये अनिवार्य लवादाची प्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता, असे सांगणारी एक टीप एनजीओने शेअर केली आहे.