जळगाव : रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गव्हाचे मोठे उत्पादक मानले जातात. मात्र दोन्ही देशांदरम्यान युध्दामुळे गहू टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारताने गहू निर्यातबंदी जाहीर केली आहे. दुसरीकडे भारतात गव्हाचे उत्पादन देखील घटले आहे. या पार्श्वभूमीवर गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भविष्यात गव्हाचे दर अजून वाढतील, या अपेक्षेने शेतकर्यांनी गहू विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. खरिपातील कापूस आणि सोयाबीनच्या बाततीतही अशीच परिस्थिती होती. आता गहू आणि ज्वारीबाबत तेच होतांना दिसत आहे.
मराठावाड्यात गहू आणि ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीके आहेत. मात्र, उत्पादन वाढीसाठी शेतकर्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे. पाण्याची सोय आणि योग्य नियोजन होत असल्याने शेतकर्यांचा कल हा सर्वात मोठ्या नगदी पिकाकडे आहे. यंदाही शेतकर्यांनी ऊसाला जास्त प्राधान्य दिल्यामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले असून गव्हाच्या क्षेत्रात ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
याचे परिणाम बाजारपेठेतही दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवासांपासून स्थानिक बाजारपेठेत गव्हाची आवक मंदावली आहे. बाजारपेठेत गव्हाची आवक घटल्याने सध्या प्रतिक्विंटल गव्हाला २ हजार ८०० ते ३ हजार असा दर मिळत आहे. उत्पादनात घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे. शिवाय भविष्यात आणखीन दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देत आहेत.
देशांतर्गत गव्हाची टंचाई भासू नये म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात दरवाढ होईल या अपेक्षेने शेतकरी आता गहू विक्रीपेक्षा साठवणूक करु लागले आहेत. कापूस व सोयाबीन बाबतीत हेच झाले होते. जसा कापसाला विक्रमी भाव मिळाला तसाच विक्रमी भाव गव्हाला मिळेल, अशी शेतकर्यांना अपेक्षा आहे.